नैसर्गिक संकटाने अर्थव्यवस्थेवर ताण
By admin | Published: March 22, 2015 01:47 AM2015-03-22T01:47:51+5:302015-03-22T01:47:51+5:30
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका राज्याला भीषण पद्धतीने बसलेला आहे. तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग, भुईमूग, उडीद, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांहूनही कमी झाले आहे;
अतुल कुलकर्णी ल्ल मुंबई
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका राज्याला भीषण पद्धतीने बसलेला आहे. तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग, भुईमूग, उडीद, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांहूनही कमी झाले आहे; शिवाय बाजारात जाणारा मालदेखील तेवढ्याच प्रमाणात कमी झाला आहे. मराठवाड्यातले आठही जिल्हे आणि नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर या विभागातील भूजल पातळी १ मीटरपेक्षाही जास्तीने खाली गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारने केंद्राला पाठवलेल्या अहवालात ही सगळी माहिती आली आहे. राज्याची ही अवस्था आजची नाही, तर २०११पासून निसर्गाने आपला कोप दाखवला आहे. त्यावर कोणतीही उपाययोजना न केल्याने राज्याच्या अर्थसंकल्पाचे पुरते दिवाळे वाजल्यामुळेच राज्याने केंद्राकडे ६०१३.२८ कोटी रुपयांची मागणी केली आहे. शिवाय अनेक योजनांना कट लावत राज्याच्या तिजोरीतले ४ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. आॅक्टोबर २०१४मध्ये केलेल्या भूजल सर्वेक्षणाचे निष्कर्षही अत्यंत विदारक आहेत. यावर्षी भूजल पातळी सरासरीपेक्षा १ मीटरने खाली गेली असून, त्यामुळे उद्भवणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी केंद्राकडे ५९७ कोटी रुपये मागितले आहेत.
निसर्गाच्या कोपामुळे तीनवेळा प्रस्ताव बदलावे लागले. आधी आम्ही ३९२४.८४ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव दिला होता. पुन्हा २०८८.४४ कोटींचा पाठवला. एकूण गरज आजमितीला ६०१३.२८ कोटींची आहे. केंद्राकडे आम्ही सगळी वस्तुस्थिती मांडली आहे. परिस्थिती गंभीर आहे. मात्र केंद्र सरकार निश्चित भरघोस मदत करेल याबाबत पूर्ण आशादायी आहोत.
- एकनाथराव खडसे, महसूलमंत्री
च्नोव्हेंबर २०१४मध्ये ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असणारी गावे : १९,०५९
च्जानेवारी २०१५मध्ये ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असणारी गावे : ४,७५२
(दोन महिन्यांतच चित्र किती बदलले हे यावरून लक्षात येईल.)