तणावमुक्त शिक्षणासाठी...
By Admin | Published: March 23, 2015 12:25 AM2015-03-23T00:25:01+5:302015-03-23T00:25:01+5:30
तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देणारी ‘नारायणा ई-टेक्नो स्कूल’ आता मुंबईत सुरू झाले आहे
मुंबई: तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देणारी ‘नारायणा ई-टेक्नो स्कूल’ आता मुंबईत सुरू झाले आहे. बोरीवली पश्चिम येथील आयसी कॉलनी भागात बालवाडी ते ८वी इयत्तेपर्यंत ही शाळा सध्या सुरू करण्यात आली आहे. ई-टेक्नो स्कूलचे महत्त्व पालकांना समजावून देण्यासाठी शनिवारी, २१ मार्च रोजी ‘पॅरेंटिंग फॉर करिअर सक्सेस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.
या परिषदेत विद्यार्थ्यांना उत्तम भविष्य घडविण्यासाठी आवश्यक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यात यावे, याविषयी चर्चा रंगली. परीक्षेच्या ऐनवेळी ढीगभर अभ्यास करण्याचे विद्यार्थ्यांना टेन्शन येते. त्यापेक्षा वर्षभर थोडा थोडा अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात अभ्यास करता येतो. म्हणूनच नारायणा ई-टेक्नो स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना बालपणापासूनच अभ्यासाची योग्य पद्धत, त्यांच्या अंगभूत कलांना वाव देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे नारायणा ई-टेक्नो स्कूलचे अध्यक्ष के. पुनीत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बारावीनंतर विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. त्या वेळेस अभ्यासाचे दडपण अधिक असते. यासाठी शाळेत असतानाच योग्य पद्धतीने अभ्यास करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागावी, असा प्रयत्न राहील. इतर शाळांप्रमाणे कोणतीही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार नसून ही पद्धतच चुकीची असल्याचे पुनीत यांनी सांगितले.
या कार्यक्रमात ‘ई-लर्निंग प्रोगाम’चे अनावरण करण्यात आले. या प्रोगाममुळे संपूर्ण भारतभर नारायणा स्कूलच्या प्रत्येक इयत्तेच्या वर्गात एकच पाठ एकावेळी शिकवला जाणार आहे. याचा सर्व विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असे सोहेल यांनी सांगितले. तसेच ‘टॅलेंट सर्च एक्झाम’ स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभही पार पडला. तसेच आयआटी विद्यार्थ्यांनी ‘पर्सनल जर्नी आॅफ मेकिंग इट टू आयआयटी’ भागात मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)