Join us

पोलिसांसाठी तणावमुक्ती कार्यशाळा

By admin | Published: March 01, 2016 2:54 AM

आॅन ड्युटी चोवीस तास म्हटले की पटकन तोंडातून नाव बाहेर पडते ते पोलिसांचे. दहशतवादी कारवाया, गुन्ह्यांचे वाढते प्रमाण,

नवी मुंबई : आॅन ड्युटी चोवीस तास म्हटले की पटकन तोंडातून नाव बाहेर पडते ते पोलिसांचे. दहशतवादी कारवाया, गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, सतत रेड अलर्टचा इशारा, सण-उत्सव शांततेत पार पडावे यासाठी क्षणोक्षणी सतर्कता बाळगणे या सर्व कारणांमुळे पोलीस दलाला मानसिकदृष्ट्या नेहमीच खंबीर असावे लागते. मात्र शेवटी पोलिसांनाही ताणतणाव असतात. दुर्दैवाने अलीकडे पोलिसांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढल्याने विनर्स क्लबने पुढाकार घेत तणावमुक्त कसे राहावे याविषयी एनएलपी तज्ज्ञ आणि बिझनेस कोच प्रा. बासू माळी यांनी नवी मुंबईतील पोलिसांची कार्यशाळा घेतली. नवी मुंबई पोलीस दलाच्या कळंबोली येथील मुख्यालयात सुमारे ५ तास चाललेल्या या कार्यशाळेचा लाभ पोलीस अधिकाऱ्यांसह ६0 पोलीस कर्मचाऱ्यांनीही घेतला. कमीत कमी वेळेत एफआयआर रजिस्टर कशी करावी, स्वत: ताजेतवाने आणि तणावमुक्त कसे राहावे, एखादा खटला शांतपणे कसा सोडवावा, कनिष्ठांची गुणवत्ता आणि त्यांची क्षमता ओळखून त्यांना कशाप्रकारे काम द्यावे, जीवनातील उदासीनता कशी दूर करावी या सर्व समस्या न्यूरो लिंग्विस्टीक प्रोग्राम अर्थात एनएलपीच्या साहाय्याने कशा दूर कराव्या यासंदर्भात प्रा. बासू माळी यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमुळे पोलिसांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. काही पोलिसांच्या या कार्यशाळेविषयीच्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या आहेत.वाहतूक पोलीस कर्मचारी गणेश ठाकूर यांनी सांगितले की, दारू आणि सिगारेटच्या व्यसनामुळे माझी प्रगती खुंटली होती हे पत्नी आणि घरातले इतर सदस्य सांगत. मात्र कळतेय पण वळत नाही अशी स्थिती होती. या कार्यशाळेने माझे डोळे उघडले असून मी दारू आणि सिगारेट कायमस्वरूपी सोडत आहे, असे जाहीर करतो. सकारात्मक संदेश दिल्याबद्दल गणेश ठाकूर यांनी प्रा. माळींचे आभार मानले.