मुंबई : बहुचर्चित पनवेल रेल्वे टर्मिनसचे काम ६१ टक्के पूर्ण झाले आहे. शिवाय कळंबोलीमध्ये देखभाल-दुरुस्ती केंद्र उभारण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. पनवेल टर्मिनस तयार झाल्यानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात येणाऱ्या-जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस, प्रवाशांची गर्दी कमी होणार आहे. तसेच लोकलच्या वक्तशीरपणात सुधारणा होईल.
मध्य रेल्वेवर सीएसएमटी, एलटीटी आणि दादर ही तीन महत्त्वाची टर्मिनस आहेत. तेथे साधारण २५० रेल्वे गाड्यांची ये-जा असते. दिवसेंदिवस या टर्मिनसवर मेल-एक्स्प्रेसचा ताण वाढत आहे. तो कमी करण्यासाठी आणि लोकलच्या वेळापत्रकावर होणारा परिणाम टाळण्यासाठी मध्य रेल्वेने पनवेल येथे टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेतला. शिवाय कळंबोली येथे मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी केंद्र उभारण्याचाही निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात या प्रकल्पाला २०१६ मध्ये रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली.
२०१६-१७ मध्ये पनवेल टर्मिनसच्या कामाला सुरुवात झाली. आतापर्यंत टर्मिनसचे सरासरी ६१ टक्के काम पूर्ण झाले. साधारण या दोन्ही प्रकल्पांसाठी सरासरी १५४ कोटी एवढा खर्च लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पनवेल येथे टर्मिनसबरोबरच कळंबोली येथे मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी केंद्रही उभारण्यात येणार आहे. त्यामुळे देखभालीसाठी मेल-एक्स्प्रेसना दक्षिण मुंबईतील वाडीबंदर किंवा माझगाव यार्डपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नाही.
प्रवाशांना प्रकल्पाचा फायदा काय?
पनवेल स्थानकातील गर्दी कमी होणार आहे. पनवेल येथूनही मोठ्या प्रमाणात मेल-एक्स्प्रेस गाड्या सुटणार आहेत. २४ आणि २६ डब्यांच्या गाड्यांसाठी दोन नवीन फलाट होणार आहेत. पादचारी पूल, अन्य सुविधा नव्या टर्मिनसच्या ठिकाणी सुरू होणार आहेत.
दोन नवीन प्लॅटफॉर्मचे काम प्रगतीपथावर कळंबोली-पनवेल तिसरी/चौथी मार्गिका होणार एफओबी आणि भुयारी मार्ग तयार होणार सिग्नलिंगचे काम पूर्ण २६ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी चार पीट लाईन्स तयार नव्या दोन मार्गिका स्टेबलिंग काम सुरू कळंबोली-पनवेलमधील ट्रॅक फाउंडेशन आणि छोटे पूल पूर्ण देखभाल शेड आणि नवीन स्थानक इमारत जवळजवळ पूर्ण