मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 05:41 AM2024-09-28T05:41:10+5:302024-09-28T05:41:41+5:30

विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा

Strict action against officials in case of inconvenience to voters Warning of Central Election Commission | मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा

मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांची कुठेही गैरसोय झाल्याच्या तक्रारी आल्या तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मुंबईत आयोजित  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्रवारी दिला.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्यासाठी राजीव कुमार तसेच आयोगाचे दोन सदस्य सध्या मुंबई भेटीवर आले आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी गैरसोयी झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत असा कुठलाही प्रकार होणार नाही याची दक्षता घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आयोगाने बजावले. 

राजीव कुमार यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलिस महासंचालक  रश्मी शुक्ला यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही बैठक घेतली. 

गैरप्रकार रोखण्यासाठी अधिक कठोर उपाय करा

लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर, मोफत वस्तू वाटप करणे हे प्रकार रोखण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करायला हव्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीत अशा प्रवृत्तींना अजिबात खपवून घेऊ नका.

अशांविरुद्ध तत्काळ कारवाई करा, असे स्पष्ट आदेशही राजीव कुमार यांनी दिले. सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याचे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.

आयोगाच्या राज्य कार्यालयाने आतापर्यंत केलेल्या तयारीबाबतची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बैठकीत दिली.  केंद्रीय निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप उपस्थित होते.

पत्रकारांना मज्जाव कशासाठी?

मतदान केंद्रांवर बेंच, पंखे, पिण्याचे पाणी आणि शेड यासह सर्व खात्रीशीर किमान सुविधांची खात्री करा. 

मतदानासाठी लागणाऱ्या रांगांचे योग्य व्यवस्थापन केले जावे, जेणेकरुन मतदारांना तासन् तास ताटकळून त्रास सहन करावा
लागणार नाही. 

लोकसभा निवडणुकीत पत्रकारांची गैरसोय झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याकडे लक्ष वेधून पत्रकारांना विनाकारण कोणताही मज्जाव केला जाऊ नये, अशी सूचना आयोगाने केली.

अहवाल न दिल्याने व्यक्त केली नाराजी

अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत केलेल्या सूचनांचा अहवाल न दिल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने या बैठकीत नाराजी व्यक्त केली.

Web Title: Strict action against officials in case of inconvenience to voters Warning of Central Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.