लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आखून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना डीजीसीएने दिल्या. परंतु, बहुतांश प्रवाशांना त्याबाबतचे गांभीर्य नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.
विमानतळावर प्रवेश केल्यानंतर बरेच प्रवासी मास्क वापरत नाहीत किंवा तो हनुवटीखाली सरकवतात. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. अशा प्रकारांमुळे विमानतळ हेच कोरोना विषाणूचे केंद्र बनण्याचा धोका आहे. त्यामुळे विमानतळावर तैनात सुरक्षारक्षक किंवा सीआयएसएफच्या जवानांनी संबंधित प्रवाशांना समज द्यावी. तरीही ते ऐकत नसल्यास त्यांना सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात द्यावे, असे डीजीसीएने आपल्या आदेशात म्हटले आहे. मास्क परिधान करणे किंवा सोशल डिस्टन्सिंगबाबत सूचना देऊनही त्यांचे पालन न केल्यास अशा प्रवाशांना विमानतळावर प्रवेश दिला जाणार नाही. विमानतळाच्या आत या नियमांचे पालन न केल्यास प्रवास करू दिला जाणार नाही. विमानातून प्रवास करताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर नागरी उड्डयन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
...........................