मुंबई : साकीनाक्यातील अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले की, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जी काही कठोर शिक्षा आहे ती केली जाईलच, पोलीस खात्याला मी यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. या घटनेचा वेळोवेळी अहवाल मला द्या, अशा सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.
--------------
अन्य प्रतिक्रिया
आरोपीला फाशी द्या
राजावाडीत जाऊन मी तिची माहिती घेतली होती. तिच्या आईला भेटून माहिती घेतली होती. आज तिचा मृत्यू झाला, हे अत्यंत वाईट झाले. या महिलेला दोन मुले आहेत. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.
-मनीषा कायदे (शिवसेना नेत्या)
---------------
कठोर शिक्षा करा
निर्भयाच्या घटनेनंतर कायदा बदलला, पण समाजाची मानसिकता बदलली नाही. सीसीटीव्ही आहेत, त्यात या घटना दिसल्या पाहिजेत. आरोपीवर कारवाया झाल्या पाहिजेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे माझा पाठपुरावा सुरू आहे. या आरोपीने संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात काही गुन्हे केले आहेत का, हे तपासण्याचे आदेश दिले आहेत.
- नीलम गोऱ्हे (विधान परिषदेच्या उपसभापती)
-------
कायद्याचा धाकच राहिला नाही
ही संतापजनक घटना असून, यावर काय प्रतिक्रिया द्याव्यात, हे कळत नाही. ही घटना घडल्याने मुंबईतील तरुणी रात्री-अपरात्री सुरक्षित कशा राहतील, हा खरा प्रश्न आहे. पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी घटना घडत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही. नराधमांना कायद्याचा धाक राहिला नाही. आपण कठोर कायदा राबवण्यात अपयशी ठरत आहोत.
- प्रवीण दरेकर (विरोधी पक्षनेते, विधान परिषद)
माफ कर ताई
साकीनाका पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला. या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचे घेणे-देणे नाही. सावित्रीच्या लेकी म्हणवून घेताना आम्हाला लाज वाटते.
- चित्रा वाघ (भाजप महिला उपाध्यक्ष)
--------
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू
महिलेचा मृत्यू दु:खद आहे. लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करू. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू. नराधमांच्या मनात भीती निर्माण होईल, अशी शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
- नवाब मलिक (राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री)