लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): गेल्या काही दिवसांत व्यापारी जहाजांवर झालेला ड्रोनद्वारे हल्ला चाचेगिरी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. भारतीय नौदलाच्या आयएनएस इम्फाळ या मिसाइल नष्ट करण्याची क्षमता असलेल्या युद्धनौकेचे अनावरण राजनाथ सिंह यांच्या हस्ते मुंबईत झाले. त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांत एमव्ही केम प्लुटो आणि एमव्ही साईबाबा या दोन्ही व्यापारी जहाजांवर ड्रोनद्वारे हल्ला झाला होता. यापैकी एमव्ही प्लुटो या जहाजावर २१ कर्मचारी होते तर अन्य जहाजावर २५ कर्मचारी होते. हे हल्ले सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतले आहेत. या जहाजांवर हल्ला करणारे खोल समुद्रात कितीही लांब लपत असले तरी त्यांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे राजनाथ सिंह म्हणाले.
चार विनाशकारी यंत्रणा तैनात
चाचेगिरी आणि ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी चार विनाशकारी यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, पी- ८१ विमाने, सी गार्डीयन्स, हेलिकॉप्टर, तटरक्षक दलाच्या नौकाही तैनात करण्यात आल्या आहेत. या सर्व यंत्रणांतर्फे संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार म्हणाले.