वीजचोरांवर होणार कडक कारवाई
By admin | Published: March 27, 2016 01:30 AM2016-03-27T01:30:55+5:302016-03-27T01:30:55+5:30
वीज बिल थकविल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या वीज ग्राहकांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी महावितरणकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली
मुंबई : वीज बिल थकविल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या वीज ग्राहकांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी महावितरणकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली असून, या माध्यमातून वीजचोरांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी दिली.
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांकडील थकबाकी वसूल करण्याबाबत नुकतीच भांडुप परिमंडळामध्ये अधिकारी आणि वीज कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीत सतीश करपे बोलत होते. अनेक महिन्यांची वीज बिले भरण्यात आली नाहीत तर संबंधित वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जातो. अशा प्रकारे वीजपुरवठा खंडित झालेले वीज ग्राहक चोरून अथवा शेजाऱ्याच्या मीटरमधून वीज जोडणी घेऊन वीज वापरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या प्रकारांना आळा घालणे आणि मोठ्या प्रमाणावर थकीत असलेल्या वीज बिलांची थकबाकी वसुली करण्यासाठी कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे करपे यांनी नमूद केले.
थकबाकी न भरता वीज वापरणाऱ्या ग्राहकांनी थकबाकी भरून अधिकृत वीजपुरवठा घ्यावा; तसेच बिलाबाबत काही शंका असल्यास ठाणे मंडळातील वीज ग्राहकांनी ग्राहक सुविधा केंद्र, ठाणे येथे तर वाशी मंडळातील वीज ग्राहकांनी ग्राहक सुविधा केंद्र येथे संपर्क साधावा.
७ दिवसांच्या आत तक्रारींचा निपटारा करून थकबाकी भरणाऱ्या वीज ग्राहकाला अधिकृतरीत्या वीजपुरवठा सुरू करून दिला जाईल, अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.