मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले असताना कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राज्यात सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईसह राज्यात सर्व महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सुमारे दोन लाखांवर पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. बुधवारपासून सर्वत्र आवश्यकतेनुसार नाकाबंदी लावण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवला जाणार असून, या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गर्दी करू नये, आतषबाजी टाळावी
मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राइव, गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव, वरळी आणि जुहू अशा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, सामाजिक अंतराचे पालन, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, ३१ डिसेंबरला रात्री उशिरा धार्मिक अथवा सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, नववर्षाच्या स्वागतासाठीची आतषबाजी टाळावी, नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक स्थळी होणारी गर्दी टाळावी, अशा विविध सूचना यापूर्वीच जारी करण्यात आल्या आहेत.