येत्या १५ डिसेंबरला वाढवण बंदर हद्दपार करण्यासाठी मुंबई ते झाई पर्यंतच्या किनारपट्टीवर कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 04:46 PM2020-12-13T16:46:15+5:302020-12-13T16:46:35+5:30

Strict closure on coast from Mumbai : विधानसभा अधिवेशनावर मच्छिमार आपला निषेध नोंदवणार आहेत.

Strict closure on coast from Mumbai to Zai to deport Wadhwan port on December 15 | येत्या १५ डिसेंबरला वाढवण बंदर हद्दपार करण्यासाठी मुंबई ते झाई पर्यंतच्या किनारपट्टीवर कडकडीत बंद

येत्या १५ डिसेंबरला वाढवण बंदर हद्दपार करण्यासाठी मुंबई ते झाई पर्यंतच्या किनारपट्टीवर कडकडीत बंद

Next


मुंबई : मच्छिमार, स्थानिक भूमिपूत्र, शेतकरी,बागायतदार व डायमेकर्स यांना उध्वस्त करणाऱ्या प्रस्तावित विनाशकारी वाढवण बंदर कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी व मच्छिमारांची एकजूट दाखवण्यासाठी तसेच राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी येत्या मंगळवार दि,15 डिसेंबरला  मुंबई-कफपरेड ते डहाणू झाई पर्यंतची सर्व किनारपट्टी बंद राहणार आहे. यावेळी विधानसभा अधिवेशनावर मच्छिमार आपला निषेध नोंदवणार आहेत.

नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती,वाढवण बंदर विरोधी कृती समिती,ठाणे जिल्हा मच्छिमार संघ,ठाणे जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती सहकारी संघ मर्यादित,आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना  या विविध संघटनांनी या बंदची हाक दिली आहे.

एकाच वेळा ३५ कंटेनर जहाजे उभी राहतील. असे आशिया खंडातील सर्वात मोठे जेएनपिटी द्वारे वाढवण बंदर विकसीत करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. मुंबई ते गुजरातच्या कच्छ व पुढे पाकिस्तानच्या कराची पर्यंत उथळ समुद्र आहे. उथळ समुद्राला भरती ओहटीला प्रहार (करंट) जास्त असतो. त्यामुळे हा परिसर मत्स्य उत्पादन, मत्स्य सवर्धन, तसेच मत्स्य प्रजनन करिता गोल्डन बेल्ट समजला जातो. वाढवण बंदर विकसीत झाल्यास मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील किमान ९००० ते १०००० हजार मासेमारी नौकांधारक व त्यावर अवलंबून असलेली किमान १० लाख नागरिकांवर उपासमारीची वेळ येईल. त्याच बरोबर शेतकरी, बागायतदार, डायमेकर्स, लहान उद्योग करणारे देशोधडीला लागणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो व सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतला दिली.

निल क्रांती योजना अंतर्गत केंद्र सरकारने व राज्य सरकारची २६% (महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड) भागिदारी असलेले विनाशकारी प्रस्तावित वाढवण बंदर आहे. समुद्रात सुमारे 5000 एकर जागेत भराव करण्यात येणार असल्याने लगतच्या गावांमध्ये पाणी शिरून येथील नागरिक विस्थापित होणार आहे. तर वाढवण बंदरच्या परिसरातील लाखो तिवरांच्या झाडांची कत्तल होणार असल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. या सागरी पट्यात दाढा,घोळ,रावस,पापलेट,बोंबील, शिवंड अशी मिळणारी मौल्यवान मासळी संपुष्टात येणार आहे.

एका बाजूला पालघर जिल्ह्यात थर्मल पॉवरच्या प्रदूषणाने नागरिक त्रस्त आहेत. शेती बागायती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, डहाणू खाडीत मिळणा-या सुक्या माश्यांवर तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला असलेल्या अणुशक्ती केंद्राचे  रेडिएशन सहन करत आहेत. त्यातून कॅन्सर सारख्या भयंकर आजारांना आम्ही तोंड देत आहोत अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी दिली.
    
तिसऱ्या बाजूला बोईसर एमआयडीसी  सागरी जिल्ह्यातील महानगर पालिका, नगरपालिकाचे प्रदूषण पराकोटीचे वाढले आहे. त्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्याचे दुष्परिणाम समुद्रावर होऊन मच्छिमार भोगत आहेत. पर्यावरण, आरोग्य दृष्ट्या तसेच नष्ट झालेल्या पारंपरिक व्यवसायाने त्रस्त असताना हा विनाशकारी प्रकल्प आम्ही आमच्या माथी कदापी मारून घेणार नाही असा इशारा नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला.
 

Web Title: Strict closure on coast from Mumbai to Zai to deport Wadhwan port on December 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.