मुंबई : राईट टू एज्युकेशनचे (आरटीई) सर्व निकष पूर्ण केल्यानंतरही मुंबईतील ६३ प्राथमिक विनाअनुदानित शाळांच्या अनुदान मान्यतेचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. राज्य सरकारकडून ५० टक्के अनुदान मिळाल्यानंतरच अनुदानाला मान्यता देण्याचा निर्णयावर महापालिकेचा शिक्षण विभाग ठाम आहे. यामुळे नाराज शिक्षकांनी शिक्षण समितीबाहेरच ठिय्या आंदोलन करीत आपला रोष व्यक्त केला.आरटीई निकषांचे पालन करून खेळाचे मैदान तसेच संरक्षण भिंत असलेल्या शाळांना अनुदान मान्यता देण्यात येते. या निकषांचे पालन न केल्याचा ठपका ठेवून ६३ मराठी विनाअनुदानित शाळांच्या अनुदान मान्यतेचे प्रस्ताव लटकला आहे. मात्र या सर्व शाळांनी जवळपास सर्व निकषांचे पालन करून आपण अनुदानास पात्र ठरत असल्याचे शिक्षण विभागाला कळवले आहे. तरीही या शाळांना अनुदानापासून वंचित ठेवले जात असल्याने शिक्षक हवालदिल झाले आहेत.या शाळांमधील शिक्षकांनी आपल्या व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षण समितीची बैठक सुरू असलेल्या दालनाबाहेरच ठिय्या केला. समिती सदस्य सचिन पडवळ व साईनाथ दुर्गे यांनी या शिक्षकांची भेट घेऊन त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र राज्य सरकारकडे थकीत २३०० कोटी रुपये आल्यानंतर त्यातील काही रक्कम अनुदान देण्याचा विचार केला जाईल, असे अधिकारी सांगत आहेत.
शिक्षण समितीबाहेर शिक्षकांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 3:37 AM