कसा कमी हाेणार काेराेना संसर्ग?; सकाळच्या सुमारास भुलेश्वर मार्केट, दागिना बाजार सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून राज्य सरकारने लागू केलेल्या कठोर निर्बंधांचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला होता. घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई मंगळवारीही नेहमीप्रमाणे सुरू होती. काही ठरावीक ठिकाणे वगळली तर अक्षरश: रोजच्याप्रमाणे मस्जिद बंदर, मनीष मार्केट, भुलेश्वर मार्केट, दागिना बाजार, लालबाग मार्केट, दादर मार्केटसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील सर्वच माेठ्या बाजारपेठा सकाळपासून सुरू होत्या. शिवाय येथे ग्राहकांची गर्दी होती. सकाळी ११ नंतर मात्र पोलिसांची वाहने ठिकठिकाणच्या बाजारपेठांत गस्त घालू लागल्यानंतर बहुतांश दुकानदारांनी दुकाने बंद केली. शिवाय बाजारपेठाही बंद झाल्याने येथील गर्दी विरल्याचे चित्र होते.
ब्रेक दि चेनसाठी राज्य सरकारने एप्रिल महिन्यात नव्याने निर्बंध लागू केले आहेत. मात्र आर्थिक नुकसान होत असल्याने सर्वच स्तरातून यास विरोध केला जात आहे. विशेषत: व्यापारी आणि दुकानदारांकडून यास विरोध होत असून, सोमवारी रात्री ८ नंतरही मुंबईमधील बहुतांश व्यवहार सुरळीत सुरू होते. मंगळवारी म्हणजे नव्या निर्बंधांच्या पहिल्याच दिवशी सकाळपासूनच दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील बाजारपेठा सुरू होत्या. दक्षिण मुंबईत मुंबापुरीतल्या मोठ्या बाजारपेठा आहेत. यात मस्जिद बंदर, क्रॉफर्ड मार्केट, गिरगाव, भायखळा, लालबाग मार्केट यांचा समावेश हाेताे. मात्र सकाळी येथील सर्वच दुकाने, व्यापार सुरळीत सुरू होते. अत्यावश्यक दुकानांसोबत इतर दुकाने तसेच फेरीवालेही सर्वत्र ठाण मांडून बसले होते.
ज्या परिसरात कोरोनाचे रुग्ण माेठ्या संख्येने आढळून आले होते तेथील बाजारपेठा आणि दुकाने भल्या पहाटेच बंद करण्यात आली होती. यात कुर्ला रेल्वेस्थानकालगतच्या बाजारपेठेचा समावेश होता. मात्र लालबाग मार्केट, मस्जिद बंदर येथील बहुतांश दुकाने खुली होती. दादर मार्केट येथील बहुतांश दुकाने, बाजारपेठा सुरू हाेत्या. वरळी, माहीम, कुर्ला, सायन, वांद्रे, घाटकोपर, अंधेरीसह बोरीवली आणि कांदिवली, गोरेगाव येथील छोटे-मोठे मार्केट, बाजार, दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होती. सकाळी ११ नंतर मुंंबईत सर्वच ठिकाणी पोलिसांची वाहने गस्त घालू लागली.
पश्चिम उपनगरातील बोरीवली, कांदिवली, गोरेगाव येथेही सर्वसाधारण अशीच परिस्थिती हाेती.
वेगाने धावणारी मुंबई ‘ब्रेक दि चेन’साठी दुपारी १ ते ४ या वेळेत बऱ्यापैकी धीम्या गतीने सुरू होती. कॉलनीसह वस्तीमधील रस्ते निर्मनुष्य झाले होते. दुपारी ४ आणि ५ वाजेपर्यंत असणारी ही परिस्थिती सायंकाळी ६ वाजता पुन्हा बदलली आणि मुंबईचे रूपांतर गर्दीत होऊ लागले. दरम्यान, दिवसभर मुंबईत कुठेही नियम पाळले जात नव्हते. सकाळपासून दुपारी आणि सायंकाळी व रात्रीदेखील सर्वत्र निर्बंधांचा फज्जा पहिल्याच दिवशी उडाल्याचे चित्र होते.
* दुपारी १ ते ४ वाजेपर्यंतच रस्ते निर्मनुष्य
सकाळी ११ वाजता पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितले. दुपारी १२च्या दरम्यान मात्र वेगाने धावणाऱ्या मुंबईचा वेग किंचित कमी झाला. दुपारी बारा वाजता वाहनांची वर्दळ बहुतांश रस्त्यांवरील माणसांची गर्दी कमी होत गेली. दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत तर सर्वच रस्ते निर्मनुष्य झाले. बाजारपेठा किंवा रेल्वेस्थानक आणि बसस्थानकालगतच्या परिसरात वर्दळ असली तरी त्याचे प्रमाण कमी होते. बहुतांश ठिकाणी पोलीस हटकत असल्याने गर्दी कमी होत असल्याचे आणि दुकाने बंद होत असल्याचे चित्र होते. त्यानंतर संध्याकाळी मुंबई पुन्हा गजबजली.
* सकाळचे चित्र
- दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील बाजारपेठा सुरू. नेहमीप्रमाणेच सर्वत्र फेरीवाल्यांचे बस्तान.
- मस्जिद बंदर, मनीष मार्केट, भुलेश्वर मार्केट, दागिना बाजार, लालबाग मार्केट, दादर मार्केटसह माेठ्या बाजारपेठा सुरू.
- दादर मार्केट येथील बहुतांश दुकाने, बाजारपेठा, वरळी, माहीम, कुर्ला, सायन, वांद्रे, घाटकोपर, अंधेरीसह बोरीवली आणि कांदिवली, गोरेगाव येथील छोटे-मोठे मार्केट, बाजार, दुकानदारांनीही माेडले नियम.
....................................