लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्व खासगी आस्थापनांना १०० टक्के लॉकडाऊन न लावता ५० टक्के कर्मचाऱ्यांसह सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत काम करण्याची मुभा द्यावी म्हणून चेंबूरच्या व्यापाऱ्यांच्या वतीने मनपा एम. पश्चिम सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे. मुंबईत सध्या ८० टक्के खासगी आस्थापना आहेत आणि ही सर्व आस्थापने संपूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे त्यांना माेठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे या व्यापाऱ्यांनी सांगितलेौ
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालणे आवश्यक आहे. परंतु मुंबई शहरात निर्बंधांचे रूपांतर सध्या संपूर्ण लॉकडाऊनमध्ये झाले आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन करणार नाही, पण निर्बंध कडक करण्यात येतील, अशी घोषणा केली होती. सर्व खासगी कार्यालये, दुकाने, आस्थापने, उपाहारगृहे संपूर्णपणे बंद करणे हे कडक निर्बंध नसून एक प्रकारचे लॉकडाऊनच झाले आहे, असे भाजपा नगरसेविका आशा सुभाष मराठे यांनी सांगितले.
यापूर्वी शासनाने धनाढ्य विकासक, कंत्राटदार, जाहिरातदार, पंचतारांकित हॉटेल्सना ५० टक्के बऱ्यापैकी सूट दिल्याचे सांगितले आहे. परंतु, ८० टक्के सामान्य मुंबईकरांना निवासी मालमत्ता करात, जलदेयकात व सामान्य व्यापाऱ्यांना अनुज्ञापन शुल्कात कुठलीही सवलत दिलेली नाही. कुठलेही आर्थिक साहाय्य केलेले नाही. बारा बलुतेदारांचे रोजगार बुडाल्यावर कुठलेही आर्थिक पॅकेज दिलेले नाही.
ही बाब लक्षात घेत सर्व खासगी आस्थापनांना १०० टक्के लॉकडाऊन न लावता ५० टक्के कर्मचाऱ्यांसोबत सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत काम करण्याची परवानगी दिली पाहिजे, असे अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीचा नीट विचार करून त्वरित नवीन नियमावली तयार करावी अन्यथा याबाबाबत आंदोलन करण्यात येईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.