मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात खाली आलेल्या कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा एकदा वर गेला आहे. दुर्दैव म्हणजे पश्चिम आणि पूर्व उपनगरातील अनुक्रमे दहिसर, बोरीवलीसह चेंबूर, मानखुर्द आणि कुर्ला परिसरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वेगाने आढळून येत आहेत. रुग्णांची संख्या वाढूनही मुंबईकर मात्र त्यास गांभीर्याने घेत नाहीत. कोरोना आता पुन्हा एकदा मुंबईकरांच्या दरात येऊन ठेपला आहे. कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी बहुतांश ठिकाणी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने लागू केलेले निर्बंधदेखील झुगारण्यात येत आहेत. मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या आकड्यांचा विस्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र, मुंबईकरांसाठी हे कठोर निर्बंध जणू नावालाच आहेत. कारण फोर्ट येथील स्थानक, पर्यटन आणि बाजार परिसर, मशीद बंदर येथील मार्केट परिसर, भायखळा येथील मार्केट परिसर, ग्रँट रोड येथील लॅमिंग्टन रोड, दादर येथील संपूर्ण मार्केट परिसर, सायन येथील उपाहारगृहे, कुर्ला आणि घाटकोपर येथील उपाहारगृहे, लोअर परळ येथील उपाहारगृहे, सांताक्रुझ येथील सार्वजनिक परिसर, मालाड येथील मार्केट आणि बाजार परिसर अशा बहुतांश ठिकाणी कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध नागरिकांकडून झुगारण्यात येत आहेत.
----------------
हॉटेल
हॉटेल्समध्ये ५० टक्के उपस्थितीचा नियम पाळला जात नाही. मुंबईत बहुतांश ठिकाणी हॉटेल्समध्ये कोरोनाचे नियम झुगारण्यात येत आहेत. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मोठी आणि नामांकित हॉटेल्स कोरोनाचे नियम पाळत आहेत. बाकीच्या ठिकाणी गर्दीचा महापूर होत आहे. नियम पाळत नाहीत अशा हॉटेल्समध्ये भायखळा, ग्रँट रोड, लोअर परळ, कुर्ला, घाटकोपर परिसराचा समावेश आहे. यातील बहुतांशी हॉटेल्स ही दाटीवाटीची वस्ती असलेल्या परिसरातील असून, वांद्रे, कुर्ला येथे हे प्रमाण अधिक आहे. कुर्ला येथील एलबीएस मार्गावरील बहुतांशी हॉटेल्स रात्री १२ नंतरदेखील सुरू राहत असून, येथे गर्दीच्या महापुराने कहर केला आहे. मास्क तर येथे नावालादेखील वापरला जात नाही.
----------------
गृह विलगीकरण
मुंबई महापालिका सातत्याने दणके देत असल्याने भीतीच्या पोटी का होईना गृह विलगीकरणादरम्यान काहीसे नियम पाळले जात आहेत. गृह विलगीकरण झालेल्या घराच्या आवारात ताकीद दिली जात आहे. ज्या झोपड्यांत, चाळीत, सोसायटी आणि इमारतीमध्ये आजघडीला कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत तेथे नागरिक स्वत:हून काळजी, खबरदारी घेत आहेत. नियम पाळत आहेत. एखाद्या इमारतीमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला तर हा परिसर सॅनिटाईज केला जात नाही. केवळ रहिवाशांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.
----------------
अंत्यविधी
अंत्यविधीदरम्यानही कोरोनाचे नियम पाळण्याची अधिक गरज आहे. मात्र येथे तर नियमांची ऐशीतैशी होते. मुळात अंत्ययात्रेदरम्यान आणि स्मशानभूमीत कमीतकमी म्हणजे २० जणांच्या उपस्थितीचा नियम आहे. मात्र हा नियम फार कमी ठिकाणी पाळला जातो. मुळात याबाबत नागरिकांना फार माहीतदेखील नाही, अशी अवस्था आहे.
----------------
विवाह समारंभ
मुंबईत दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना पुन्हा वाढू लागल्याने लग्न समारंभासाठी दोन्ही बाजूंच्या ५०-५० माणसांना परवानगी देण्यात आली आहे. इतक्या कमी लोकांमध्ये मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी यांना बसवता येत नसल्याने वेगवेगळ्या कल्पना लढविण्यात येत आहेत. मंगल कार्यालयांमध्ये गर्दी केल्यास पालिकेच्या वतीने गुन्हे दाखल केले जात आहेत. मंगल कार्यालयात ठरावीक वेळा देऊन पाहुण्यांना बोलाविण्यात येत आहे. काही जणांनी मंगल कार्यालय केवळ धार्मिक विधीसाठी ठेवले आहे. मुंबईतील इमारती, सोसायटी, चाळींमध्ये रोशणाई केली जात आहे. वरातींना बंदी असल्याने डीजे किंवा बेन्जो लावून नाचण्याची हौस पूर्ण केली जात आहे. जेवणाचे वेगवेगळे मेन्यू ठेवून अगदी मंगल कार्यालयांप्रमाणेच कॅटरर्स ठरवून पक्वान्नाची मांडणी केली जात आहे. मुंबईत ठिकठिकाणी हे चित्र दिसत आहे. मात्र हे सर्व करताना कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येते.
----------------
चित्रपटगृहे
५० टक्के उपस्थितीत चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. सुरुवातीला चित्रपटगृहांमध्ये नियमांचे पालन काटेकोरपणे होत होते. मात्र नंतर प्रेक्षकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होऊ लागले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चित्रपटगृहांकडून चित्रपटाचे तिकीट थेट मोबाइलवर पाठविण्यात येते. चित्रपटगृहांत प्रवेश करण्याआधी तापमान तपासणी तसेच निर्जंतुकीकरण करण्यात येते. चित्रपटगृहाच्या आत गेल्यानंतर एक सीट सोडून दुसऱ्या प्रेक्षकाला बसता येते. हे नियम सर्व चित्रपटगृहांच्या वतीने घालण्यात आले असले तरीदेखील चित्रपट सुरू झाल्यानंतर मित्र-मैत्रिणी अथवा नातेवाईक मास्क बाजूला ठेवून एकत्र येऊन चित्रपट पाहतात. यामुळे नियमांचे उल्लंघन होते. त्याचप्रमाणे चित्रपट संपल्यानंतर चित्रपटगृहाच्या बाहेर पाडण्यासाठी एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. प्रेक्षकांचे हे वर्तन कोरोना वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.
----------------
कार्यालये
५०% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालय सुरू ठेवण्याची परवानगी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. मात्र, कार्यालयांमध्ये कोरोनाचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची तापमान तपासणी न करता त्यांना आत सोडले जाते. कार्यालयात प्रवेश करताना उपस्थिती नोंदविण्यासाठी बायोमेट्रिक मशीनला सर्व कर्मचाऱ्यांकडून स्पर्श केला जातो. त्यामुळे या मशीनद्वारे कोरोना पसरू शकतो. कार्यालयांमध्ये एक खुर्ची सोडून आसनव्यवस्था करण्यात आली असली तरीदेखील मीटिंगदरम्यान सर्व कर्मचारी एकत्र येतात. त्याचप्रमाणे कार्यालयांमध्ये सातत्याने एसीचा वापर केला जातो व अनेक कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मास्कदेखील नसतो. जेवणाचा डबा खातानादेखील सर्व कर्मचारी एकत्र येतात. यामुळे कार्यालयांमध्येदेखील कोरोनाची लागण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.