पहिल्याच दिवशी आदेशाचे उल्लंघन; बाजारपेठा ओव्हर फ्लो, सामाजिक अंतराच्या नियमांचीही ऐसीतैसी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांना मुंबईकरांनी गुरुवारी पहिल्याच दिवशी हरताळ फासला. सर्व प्रमुख बाजारपेठांसह छोट्या बाजारपेठा आणि दुकाने सरसकट सुरू होती. दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगरासह पूर्व उपनगरात सर्वत्र खासगी आणि सार्वजनिक वाहतूकही नेहमीच्याच वेगाने सुरू हाेती. रेल्वे आणि बेस्टसह रिक्षा व टॅक्सी वेगाने धावत होत्या. सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सर्वत्र सरसकट सुरू असलेल्या व्यवहारांमुळे सामाजिक अंतराचे तीन तेरा वाजल्याचे चित्र हाेते. पोलिसांच्या गाड्या गस्त घालत असतानाच्या वेळीच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जात होते. पोलिसांची पाठ फिरताच नियम पायदळी तुडविले जात होते. संध्याकाळसह रात्रीही काही प्रमाणात असेच चित्र होते.
दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदरमधील बाजारपेठ, भायखळा येथील बाजरपेठ, लालबाग मार्केटमधील छोटी मोठी दुकाने, गिरगाव येथील बाजारपेठा, लोअर परळ, करीरोडमधील छोटे, मोठी दुकाने, कुर्ला रेल्वेस्थानकालगतची बाजारपेठ, सांताक्रुझ, घाटकोपर, मुलुंड, बोरीवलीसह मोठ्या रेल्वे स्थानकांबाहेरील बाजरापेठांमधील छोटे, मोठी दुकाने पूर्ण वेळ उघडी होती. दादर मार्केटला तर नेहमीप्रमाणे जत्रेचे स्वरुप आले होते. रेल्वेस्थानकांसह लगतच्या बाजारपेठा आणि त्यातील दुकाने सुरू असतानाच सामजिक अंतर धुळीस मिळाले होते. जीवनावश्यक गाेष्टींचा साठा करण्यासाठी मुंबईकर माेठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने सकाळी १० ते ११ या वेळेदरम्यान छोट्या आणि मोठ्या बाजारपेठांमध्ये गर्दी हाेती.
भायखळा, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, वांद्रे, मुंबई सेंट्रल, अंधेरीसह महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर गर्दी होती. रोजच्या गर्दी एवढे प्रमाण नसले तरी संचारबंदीच्या निर्बंधांचे उल्लंघन कठाेर निर्बंधांच्या पहिल्या दिवशी सर्रास करण्यात आल्याचे पहायला मिळाले. बेस्टमध्ये मात्र काही प्रमाणात निर्बंध पाळले जात होते. बहुतांश ठिकाणी धावत असलेल्या बेस्ट बसमध्ये कोणालाही उभे राहून प्रवास करू दिला जात नव्हता. याची सुरुवात बुधवारी रात्रीपासूनच झाली होती.
एकंदरच मुंबईचे चित्र पाहता मुंबईकरांना अजून तरी कडक निर्बंधांना गांभीर्याने घेतले नसल्याचेच सर्वत्र पहायला मिळाले.
* पाेलिसांची पाठ फिरताच नियमांचे उल्लंघन
पोलिसांच्या गाड्या गस्त घालत असतानाच्या वेळीच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जात होते. पोलिसांची पाठ फिरताच बंद झालेली दुकाने पुन्हा उघडली जात हाेती. मुंबईतील बहुतांश ठिकाणी असेच चित्र हाेते.
चाैकट
- दादर मार्केटला नेहमीप्रमाणेच जत्रेचे स्वरूप.
- कुर्ला रेल्वेस्थानकालगतची बाजारपेठ, मस्जिद बंदरमधील बाजारपेठ, लोअर परळ, करी रोडमधील दुकाने, लालबाग मार्केट, भायखळ्यातील बाजारपेठ, सांताक्रुझ, घाटकोपरसह मोठ्या रेल्वेस्थानकांबाहेरील बाजारपेठा सुरू.
- भायखळा, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, वांद्रे, मुंबई सेंट्रल, अंधेरीसह महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर पीक अवरला गर्दी.
.................................