मुंबईत पुन्हा कडक निर्बंध लागू होणार; मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आज महत्वाचे निर्देश

By मुकेश चव्हाण | Published: February 18, 2021 06:40 PM2021-02-18T18:40:23+5:302021-02-18T19:20:59+5:30

कुणी नियमभंग करत असेल तर वेळप्रसंगी गुन्हे नोंदवा, असे निर्देशही इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.

Strict restrictions will be imposed again in Mumbai; Important instructions given by Mumbai Municipal Commissioner today | मुंबईत पुन्हा कडक निर्बंध लागू होणार; मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आज महत्वाचे निर्देश

मुंबईत पुन्हा कडक निर्बंध लागू होणार; मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आज महत्वाचे निर्देश

Next

मुंबई: मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होत असल्याचं दिसून येत आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर राज्यभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. हळूहळू जनजीवन पुर्वपदावर येत होतं, परंतु आता कोरोना रुग्णांची वाढती संख्या ठाकरे सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) लोकांना आवाहन करताना पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर काळजी घ्या. कोरोना संपुष्टात आल्यासारखं वागू नका. अद्यापही कोरोनाचं संकट टळलं नाही. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने पुन्हा योग्य त्या खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला बैठकीद्वारे बुधवारी दिले होते. उद्धव ठाकरेंच्या या आदेशानंतर आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त  इक्बालसिंह चहल यांनी बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाची वाढती संख्या पाहता पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोना बाधित वाढत आहेत. हे लक्षात घेता पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये विवाह कार्यालये, सभागृह आदी ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात वा सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येण्यावर मर्यादा आणली गेली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात एकावेळी ५० पेक्षा जास्त जणांना एकत्र येता येणार नाही, अशी सूचना इक्बालसिंह चहल यांनी बैठकीत दिली आहे. तसेच मास्क वापरण्यासह इतर नियमांचे पालन होत नसल्यास कठोर कारवाई करण्यात यावी, असेही आयुक्तांनी बजावले आहे. कुणी नियमभंग करत असेल तर वेळप्रसंगी गुन्हे नोंदवा, असे निर्देशही इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.

आयुक्तांनी दिलेले महत्वाचे आदेश-

  • पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या इमारती प्रतिबंधीत (सील) करणार
  • होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या हातावर शिक्के मारणार
  • विना मास्क रेल्वे प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी ३०० मार्शल नेमणार
  • विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी मार्शल्सची संख्या दुप्पट होणार, दररोज २५ हजार जणांवर कारवाईचे लक्ष्य
  • मंगल कार्यलये, क्लब, उपहारगृह इत्यादी ठिकाणी धाडी टाकण्याच्या सूचना
  • ब्राझिलमधून मुंबईत येणारे प्रवासीदेखील आता संस्थात्मक विलगीकरणात
  • रुग्ण वाढत असलेल्या विभागांमध्ये तपासण्यांची संख्या वाढणार

 

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून पुढच्या टप्प्यात सर्वत्र वर्दळ वाढल्यानंतर कोरोनाचा फैलाव होताना दिसत आहे. राज्यात बुधवारी ४,७८७ नवीन रुग्णांचे निदान आणि ४० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २०,७६,०९३ झाली असून बळींचा आकडा ५१ हजार ६३१ झाला आहे.

राज्यात ३८,०१३ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ३,८५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १९,८५,२६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६२ टक्के झाले आहे. आज राज्यातील मृत्युदर २.४९ टक्के एवढा आहे. 

...तर लॉकडाऊन करण्याची वेळ येईल- महापौर

मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली. तेव्हापासून कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे, असं मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. लोक स्वत:ची काळजी घेत नसतील तर लॉकडाऊन करण्याची वेळ येईल. तशी चिंता राज्य सरकारनं व्यक्त केली आहे. प्रत्येकानं स्वत:ला, स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांना जपायला हवं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक काळजी घ्यायला हवी. तरच आपण कोरोनाची दुसरी लाट थोपवू शकू, असंही पेडणेकर म्हणाल्या.
 

Web Title: Strict restrictions will be imposed again in Mumbai; Important instructions given by Mumbai Municipal Commissioner today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.