Corona in Mumbai: ‘कोविडचे दररोज रुग्ण २० हजार झाल्यास कठोर निर्बंध लावणार’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 07:37 AM2022-01-04T07:37:28+5:302022-01-04T07:37:41+5:30
मुंबईत कोविड रुग्णांसाठी आजच्या घडीला ३० हजार खाटा राखीव आहेत. त्यामुळे दहा हजार खाटा वापरात आल्या, तरी परिस्थिती हाताळण्यासाठी आपण सक्षम आहोत. ऑक्सिजन पुरवठ्याची आपली क्षमताही चांगली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ओमायक्रॉनचा संसर्ग मुंबईत झपाट्याने वाढत आहे. मात्र, दररोज आठ ते दहा हजार बाधित रुग्ण आढळून आले, तरी प्रत्यक्षात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे कोविडबाधित रुग्णांची दररोजची संख्या २० हजार पार गेल्यास, मुंबईत आणखी कठोर निर्बंध लावण्याचा विचार केला जाईल, असे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईत सोमवारी आठ हजारांहून अधिक कोविडबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या मुंबईत ३७ हजारांवर असली, तरी यापैकी ३,७३५ रुग्ण प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल आहेत. यापूर्वी पॉझिटिव्हिटी दर पाहून निर्बंधाबाबत निर्णय घेतला जात होता. मात्र, आता रुग्णालयात उपलब्ध खाटा आणि ऑक्सिजनची दररोजची आवश्यकता पाहून निर्बंधांमध्ये सुधारणा करण्याबाबत विचार व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईत कोविड रुग्णांसाठी आजच्या घडीला ३० हजार खाटा राखीव आहेत. त्यामुळे दहा हजार खाटा वापरात आल्या, तरी परिस्थिती हाताळण्यासाठी आपण सक्षम आहोत. ऑक्सिजन पुरवठ्याची आपली क्षमताही चांगली आहे.
मात्र, दररोजची कोविड रुग्ण संख्या २० हजारांहून अधिक आढळून आल्यास तातडीने कठोर निर्बंध आणण्याबाबत पावले उचलावी लागतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. २० टक्के रूग्ण आढळले तर ती संपूर्ण इमारतच सील करण्यात येईल, असेही आयुक्त चहल यांनी सांगितले.