मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला लॉकडाऊनच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लावले जाणार असल्याची माहिती दिली.
मुंबईत देखील गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. मुंबईमध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले जाणार असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. (Strict restrictions will be imposed in Mumbai, said Kishori Pednekar, Mayor of Mumbai Municipal Corporation)
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईच्या लोकलमध्ये पुन्हा एकदा अत्यावश्यक सेवा म्हणून कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्याचा आमचा विचार आहे. हॉटेल ५० टक्के उपस्थितीने चालवले जाणार आहे. तसेच दुकानं आणि बाजारपेठा एक दिवस आड सुरू ठेवणार असल्याचे संकेत देखील किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.
मुंबईत बुधवारी ५ हजार ३९४ रुग्ण आढळले असून, १५ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख १४ हजार ७१४ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ६८६ झाला आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८५ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर आला आहे. २४ ते ३० मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.३७ टक्के असल्याचे दिसून आले.
मुंबईत दिवसभरात ४१ हजार ३६३ कोरोना चाचण्या झाल्या असून, आतापर्यंत ४० लाख ८३ हजार १७३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहर, उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्स ७२ असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ६१६ आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २८ हजार ६२१ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.
मुंबईत दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने यंत्रणेवरील ताणही वाढतो आहे. मुंबईत रुग्णालये, जम्बो कोरोना केंद्रांत कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या १६ हजार ५६१ खाटांपैकी १२ हजार ६२८ खाटांवर रुग्ण आहेत. तर केवळ ३ हजार ९३३ खाटा उपलब्ध असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
राज्यात कठोर निर्बंध लागणार; आगामी एक-दोन दिवसांत घोषणा करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं स्पष्ट केलं आहे. सध्या २ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेटाळून लावल्या आहेत. लॉकडाऊनसंदर्भात तुर्तास तरी चर्चा सुरु आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
लॉकडाऊन करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र याबाबत सरकारची चर्चा सुरु आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते. राज्यात ५० टक्के लॉकडाऊन लागणार, हे वृत्त राजेश टोपे यांनी फेटाळून लावले. पण सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे. येत्या एक-दोन दिवसांत या निर्बंधाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. आम्ही लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे, असा इशारा देखील राजेश टोपे यांनी दिला आहे.