प्रजासत्ताक दिनानिमित्त कडेकोट बंदोबस्त
By admin | Published: January 25, 2016 01:42 AM2016-01-25T01:42:13+5:302016-01-25T01:42:13+5:30
प्रजासत्ताक दिनासाठी मुंबई पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे. दादरच्या शिवाजीपार्कात होणाऱ्या मुख्य सोहळ्याच्या ठिकाणासह सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे
मुंबई : प्रजासत्ताक दिनासाठी मुंबई पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे. दादरच्या शिवाजीपार्कात होणाऱ्या मुख्य सोहळ्याच्या ठिकाणासह सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. ‘इसिस’च्या अतिरेकी कारवाया आणि केंद्रीय तपास यंत्रणा व एटीएसच्या अटक सत्रामुळे देशभरात हायअॅलर्ट जारी करण्यात आला असताना, मुंबई पोलीस खास काळजी घेत आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्कात होणाऱ्या मुख्य संचलन सोहळ्याच्या ठिकाणी १०० पोलीस अधिकाऱ्यांसह ५०० पोलीस कर्मचारी, शिघ्रकृती दलाची ६ पथके, ६ कॉम्बॅट व्हॅन, राज्य राखीव पोलीस दलाच्या ८ तुकड्या, बॉम्बशोधक व नाशक पथके आणि श्वान पथके सोमवारपासूनच तैनात ठेवली आहेत. या ठिकाणी नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आला असून, पॅराग्लायडिंग, ड्रोन आणि पॅरेशूट उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. २६ जानेवारीला सकाळी ६ पासून दुपारी १२ पर्यंत दादर परिसरातील काही वाहतुकीच्या मार्गांत बदल करण्यात आले आहेत, तर काही रस्ते
वाहतूक आणि पार्किंगसाठी बंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
३० हजार पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या १२ तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिसांच्या मदतीने शहरात महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून संशयित व्यक्ती आणि वाहनांची तपासणी करण्यात येत आहे, तसेच शहराबाहेरून आलेल्यांची माहिती हॉटेल्स आणि लॉजच्या मालकांकडून मागविण्यात आली आहे. मॉक ड्रिल घेण्यात येत असून, संशायस्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी मुंबईकरांना केले आहे. (प्रतिनिधी)