वाढवण बंदराविरोधात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:25 AM2020-12-16T04:25:22+5:302020-12-16T04:25:22+5:30
कफ परेड ते झाईदरम्यान कोळीवाडे, किनारपट्टी बंद लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई/पालघर : पालघर जिल्ह्यात होऊ घातलेल्या वाढवण बंदराविराेधात ...
कफ परेड ते झाईदरम्यान कोळीवाडे, किनारपट्टी बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/पालघर : पालघर जिल्ह्यात होऊ घातलेल्या वाढवण बंदराविराेधात मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला पाठिंबा देण्यासाठी डहाणू तालुक्यापासून मुंबईतील कफ परेडपर्यंतच्या किनारपट्टी भागातील मासे खरेदी-विक्री बंद ठेवण्यात आली हाेती. आठ ते दहा हजार बाेटी मासेमारीसाठी समुद्रात नांगरून तशाच ठेवण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे किनारपट्टी भागातील सर्वच व्यवहार ठप्प झाले हाेते.
महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, पालघर, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्य. सह. संघ लि., आदिवासी एकता समिती व आदिवासी कष्टकरी समिती यांच्यातर्फे या बंदची हाक देण्यात आली होती. रिक्षाचालक, रिसाॅर्ट व्यावसायिकांनीही या बंदमध्ये सहभाग घेतला.
मच्छीमार एकजुटीचा विजय असो, अशा घाेषणा देत ससून डाॅक, भाऊचा धक्का या मोठ्या उलाढाल करणाऱ्या व्यापारी बंदरात सर्वांनी स्वयंस्फूर्तीने मार्केट बंद करून आंदोलनाला उस्फूर्त पाठिंबा दिल्याची माहिती महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो व सरचिटणीस किरण कोळी यांनी ‘लोकमत’ला दिली.
कुलाबा, कफ परेड, वरळी, खारदांडा, जुहू मोरागाव, वर्सोवा, मढ, भाटी, मालवणी, मनोरी, गोराई हे मुंबईतील सर्व कोळीवाडे बंद हाेते. गावागावात मानवी साखळी, प्रभात फेऱ्या काढून तसेच सभा घेऊन केंद्र व राज्य सरकारचा निषेध केल्याची माहिती किरण कोळी यांनी दिली.
वाढवण बंदर विकसित झाल्यास मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील किमान नऊ ते दहा हजार मासेमारी नौकाधारक आणि त्यावर अवलंबून किमान १० लाख नागरिकांवर उपासमारीची वेळ येईल. त्याचबरोबर शेतकरी, बागायतदार, डायमेकर्स, लहान उद्योग करणारे देशोधडीला लागतील, असा आंदाेलकांचा आराेप आहे.
पालघर किनारपट्टी भागात बंदराला विराेध करण्यासाठी महिला, पुरुष आणि बच्चेकंपनी हातात निषेधाचे फलक घेत रस्त्यावर उतरले हाेते. या वेळी ‘एक दाे एक दाे, वाढवण बंदर फेक दाे’ यासारख्या विविध घाेषणांनी परिसर दुमदुमून गेला हाेता. मासेमारी व्यवसाय, सागरी किनाऱ्यावरील पर्यटन ही आमची राेजीराेटी आहे. तीच हिरावून घेतल्यास येथील भूमिपुत्र पुरता उद्ध्वस्त हाेईल, अशी भीती आंदाेलकांनी व्यक्त केली. सर्वच गावांत बंदराला विराेध करण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून मानवी साखळी उभारली होती. वाढवण-टिघरेपाडा येथील मुंडेश्वरी देवालयासमोर शेकडो लोक रस्त्यावर उतरले. तेथे त्यांनी बंदर उभारणाऱ्या जवाहरलाल नेहरू बंदराचा (जेएनपीटीचा) प्रतीकात्मक अंत्यविधी करून निषेध केला.