मुंबई : कोरोनामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बँकांनी कर्जपुरवठ्यात वाढ करावी या उद्देशाने रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात केली. मात्र, एसबीआय वगळल्यास कोणतीही बँक त्या कर्जपुरवठ्यासाठी प्रयत्न न करता रिझर्व्ह बँकेकडील गुंतवणुकीतच धन्यता मानत आहेत. त्यामुळे उद्देश सफल होत नसल्याचे वास्तव राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मांडले आहे.
बांधकाम व्यावसायिकांनी आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. केवळ बँकाच नव्हे तर हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन (एचएफसी) आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांनीसुद्धा कर्जपुरवठ्यासाठी काहीच केले नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये अभूतपूर्व कपात करण्यामागे केंद्र सरकारचा उद्देश चांगला होता. व्यावसायिक आणि उद्योजकांना सुलभ कर्जपुरवठ्यासाठी बँकांना निर्देश द्यावे, अशी विनंतीही त्यांना केली जाईल, असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले.