Join us  

बोनस दिला नाही म्हणून पुकारला संप, सांताक्रूझ बस डेपोतील प्रकार; प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 5:58 AM

बोनस मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 

मुंबई : ऐन दिवाळीत मुंबईकर प्रवाशांचे शनिवारी हाल झाले. बोनस दिला नाही म्हणून सांताक्रूझ बसस्थानकातील कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले. १०० बसेस आगारात दिवसभर उभ्या राहिल्याने प्रवाशांना ओला, उबर, रिक्षा तसेच टॅक्सीचा आधार घ्यावा लागला. दरम्यान, बोनस मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 

वेतनवाढ, दिवाळी बोनस, बेस्ट उपक्रमाच्या बसमध्ये मोफत प्रवास आदी विविध मागण्यांसाठी सांताक्रुझ बस डेपोतील मातेश्वरी कंपनीच्या चालक व वाहकांनी शनिवारी सकाळी कामबंद केले. कंत्राटी कामगारांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे सांताक्रुझ बस आगारातील १०० पैकी एकही बस आगराच्या बाहेर पडली नाही. 

सांताक्रुझ बस आगारातून १० मार्गांवर या १०० बसेस चालवण्यात येतात. मात्र, सकाळपासून कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत सांताक्रुझ बस आगारातील एकही बस प्रवाशांच्या सेवेसाठी धावली नाही. परिणामी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने काही मार्गांवर आपल्या ताफ्यातील बसेस चालवल्या. तर कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन देणे, पगारवाढ करणे ही जबाबदारी संबंधित कंपनीची आहे.  

टॅग्स :मुंबई