पोलिसांच्या कुटुंबीयांचा धडक मोर्चा
By admin | Published: March 22, 2016 03:38 AM2016-03-22T03:38:50+5:302016-03-22T03:38:50+5:30
राज्यात पोलिसांवर होणारे हल्ले आणि मारहाणीच्या प्रकरणांत दिवसांगणिक वाढ होत आहे. अशा प्रकरणांत मारहाण करणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची मागणी करत
मुंबई : राज्यात पोलिसांवर होणारे हल्ले आणि मारहाणीच्या प्रकरणांत दिवसांगणिक वाढ होत आहे. अशा प्रकरणांत मारहाण करणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची मागणी करत, पोलिसांच्या कुटुंबीयांनी सोमवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला.
पोलिसांना संघटना करण्याचा अधिकार नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांची संघटना तयार केल्याचे पोलीस बॉइज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत वाट पाहिल्यानंतरही पोलिसांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा गृहराज्यमंत्र्यांची भेट मिळाली नाही. परिणामी, मुख्यमंत्र्यांपर्यंत मागण्या पोहोचवण्यासाठी शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली.
पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात त्याच क्षणी अजामीनपात्र गुन्हे दाखल करा, पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना पोलीस भरतीत १५ टक्के आरक्षण द्या, वैद्यकीयदृष्ट्या अकार्यक्षम होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या जागी त्यांच्या पाल्याला पोलीस सेवेत घ्यावे, निवृत्तीनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात, २०११ नंतर भरती
झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हा बदलीचा मार्ग मोकळा करावा, या त्यांच्या प्रमुख मागण्या
आहेत. (प्रतिनिधी)