Join us

घोळ सुरूच; विकास आराखड्यातून गावठाणे, कोळीवाडे वगळले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 1:04 AM

महापालिकेच्या २०१४ ते २०३४च्या नव्या विकास आराखड्याला गेल्या ऑक्टोबर महिन्यात शासनाने मंजुरी दिली आणि नवा विकास आराखडा अंमलात आला. मात्र, अजून आराखड्याचा घोळ सुरूच असून, नव्या विकास आराखड्यातून मुंबईतील अनेक गावठाणे व कोळीवाड्यांना वगळण्यात आले आहे.

मुंबई : महापालिकेच्या २०१४ ते २०३४च्या नव्या विकास आराखड्याला गेल्या ऑक्टोबर महिन्यात शासनाने मंजुरी दिली आणि नवा विकास आराखडा अंमलात आला. मात्र, अजून आराखड्याचा घोळ सुरूच असून, नव्या विकास आराखड्यातून मुंबईतील अनेक गावठाणे व कोळीवाड्यांना वगळण्यात आले आहे. परिणामी, भूमिपुत्रांमध्ये नाराजी पसरली आहे.माजी मुख्य सचिव दिनेश अफझलपूरकर यांच्या समितीच्या अहवालाप्रमाणे मुंबईत १८९ गावठाणे व ३८ कोळीवाडे आहेत. मात्र, नव्या आराखड्यात मुंबईत ५२ गावठाणे दाखविण्यात आली असून, त्यामध्ये शहरात १, पश्चिम उपनगरात ३४ आणि पूर्व उपनगरात १७ गावठाणांचा समावेश करण्यात आला आहे, तर नव्या आराखड्यात एकूण १५ गावठाणे दाखविण्यात आली नाहीत. यामध्ये शहरात २, पश्चिम उपनगरात १० आणि पूर्व उपनगरात ३ असे एकूण १५ गावठाणे दाखविण्यात आली नाही, तर २ गावठाणे चुकून कोळीवाडे म्हणून दाखविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, ३ गावठाणे दाखवण्यात आली असून, त्यांचे नावे देण्यात आलेली नाहीत.दरम्यान, नव्या आराखड्यातील गावठाण आणि कोळीवाड्यांबाबतीत हरकती नोंदविण्याची अंतिम तारीख ही ७ डिसेंबर होती. मोठ्या प्रमाणात हरकती पालिका व महसूल खात्याकडे नोंदविण्यात आल्या आहेत. परिणामी, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.काय आहेत मागण्या...वॉचडॉग फाउंडेशन, बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशन, बॉम्बे कॅथॉलिक सभा आणि सेव्ह अवर लँड या संघटनांनी १ डिसेंबर रोजी वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी सिटी सर्व्हे रेकॉर्डप्रमाणे गावठाणांच्या सीमा आराखड्यात दाखवाव्या, गावठाणांचे सीमांकन करावे, गावठाण विस्तार कायद्याप्रमाणे दर १० वर्षांनी गावठाणांचा विस्तार केला पाहिजे, १९६० साली गावठाणांचा विस्तार केला, मात्र त्यानंतर तो करण्यात आला नाही, तो करण्यात यावा, अशा मागण्या मोर्चादरम्यान करण्यात आल्या.

टॅग्स :मुंबई