Join us

ईस्थर खून प्रकरणामुळे मुंबईच्या प्रतिमेला तडा

By admin | Published: October 31, 2015 1:40 AM

आंध्र प्रदेशची २३वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर ईस्थर अनुह्या हिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर दिल्लीच्या निर्भया प्रकरणामध्ये लोकांमध्ये जी प्रतिक्रिया उमटली

मुंबई : आंध्र प्रदेशची २३वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर ईस्थर अनुह्या हिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर दिल्लीच्या निर्भया प्रकरणामध्ये लोकांमध्ये जी प्रतिक्रिया उमटली, तिच प्रतिक्रिया या केसमध्ये उमटली. या घटनेमुळे मुंबई महिलांसाठी सुरक्षित शहर आहे, या प्रतिमेला तडा गेल्याचे निरीक्षण नोंदवत विशेष महिला न्यायालयाने २९वर्षीय चंद्रभान सानपला शुक्रवारी मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली.‘ही केस दुर्मीळ प्रकारात मोडत असल्याने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात येत आहे,’ असे विशेष महिला न्यायालयाच्या न्या. वृषाली जोशी यांनी म्हटले.‘आरोपीच्या बाजूने कोणतीच परिस्थिती नसल्याने त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात येत आहे. याला फाशीची शिक्षा ठोठावली तर समाजात आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांपर्यंत योग्य तो संदेश जाईल,’ असेही न्या. जोशी यांनी म्हटले. ‘अशा निर्घृण गुन्ह्यात आणि ज्याला गुन्हा केल्यानंतर पश्चात्ताप झाला नाही, अशा व्यक्तीला सहानुभूती दाखवणे म्हणजे न्यायाचे विडंबन करण्यासारखे आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई महिलांसाठी सुरक्षित शहर आहे, या मुंबईच्या प्रतिमेला तडा गेला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये आणि महिलांमध्ये असहायतेची भावना निर्माण झाली आहे. एलटीटी रेल्वे स्टेशन किंवा मुंबईतील कोणतेही ठिकाण तरुण मुलींसाठी केवळ असुरक्षितच नाही, तर कदाचित त्यांच्यावर बलात्कार करून हत्या केली जाऊ शकते, असा संदेश या घटनेमुळे गेला आहे,’ असे निरीक्षण न्या. जोशी यांनी या निकालात नोंदवले आहे. आरोपीच्या कुटुंबीयांचा विचार करण्यापूर्वी न्यायालयाने पीडितेच्या कुटुंबीयांचा विचार केला पाहिजे. पीडिता कमावणारी होती. तिचे पालक तिच्यासाठी वर शोधत होते. आरोपी हा सराईत चोर आहे. त्याच्या भूतकाळाचा विचार केला, तर तो सुधारण्याची काहीही शक्यता नाही, असे म्हणत न्या. जोशी यांनी सानपला फाशीची शिक्षा ठोठावली. ईस्थरवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो तिचा मोबाइल शोधण्यासाठी गेला. यावरून सानपला त्याच्या कृत्याचा पश्चात्तापच झालेला नाही, असे सिद्ध होते. (प्रतिनिधी)