CM शिंदे म्हणाले "आंदोलन मागे घ्या"; भाजप आमदार म्हणतात, "रात्रीपासूनच संपावर जा"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 05:33 PM2024-09-03T17:33:41+5:302024-09-03T17:34:03+5:30
सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले.
ST Employees Strike : पगारवाढीच्या मागणीसाठी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच पगार मिळावा या मागणीसाठी संप करण्यात आला आहे. या संपामुळे मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, रायगड, संभाजीनगर येथून एकही एसटी बस सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना या आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे म्हटलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन मिळावे असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. आज मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही भाजप आमदारांनी कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलन करण्यास सांगितलं आहे.
"एसटी कर्मचाऱ्यांच्या समितीचे धरणे आंदोलन सुरु आहे. महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी काही प्रमाणात उत्स्फूर्तपणे संपावर गेले आहेत. ३५ एसटी आगारांमध्ये आंदोलन सुरु आहे. मी सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की आज रात्रीपासून तुम्ही संपावर जा. सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर तुमच्यासोबत उभा राहणार आहे. पगारवाढ केल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही," असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विनंती
"उद्या यासंदर्भात बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होईल. पण राज्यात गणपती येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज उद्या महाराष्ट्रात आहेत. गणेशोत्सव जवळ आल्यामुळे सगळे नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत जाणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना माझी विनंती आणि आवाहन की आपण संप करु नये. सकारात्मक चर्चेतून आपण मोठे मोठे प्रश्न सोडवलेले आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.