मुंबई : मध्य रेल्वेची मेन लाइन आणि हार्बर मार्गावर रुळाला तडा जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मंगळवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास रुळाला तडा गेल्याची घटना वडाळा स्थानकात घडली. या घटनेमुळे हार्बर तब्बल दोन तास विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी उडालेल्या गोंधळामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. वडाळा स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १जवळ संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास रुळाला तडा गेल्याची घटना घडली. ही घटना निदर्शनास येताच तत्काळ प्लॅटफॉर्म क्रमांक १वरून वाशी, पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल या प्लॅटफॉर्म क्रमांक २वर वळविण्यात आल्या. घटनेनंतर रूळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. लोकल दुसऱ्या मार्गावरून वळविण्यात आल्याने १५ मिनिटे उशिराने लोकल धावत होत्या. सीएसटी तसेच वडाळ्याहून पनवेल आणि अंधेरीला जाणाऱ्या लोकल सेवांवर मोठा परिणाम झाला. कामावरून घरी परतणाऱ्यांचे यामुळे हाल झाले. वडाळासह हार्बरवरील बहुतेक स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आणि त्यामुळे गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागला. रात्री ८.४0च्या सुमारास रूळ दुरुस्तीनंतर लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्या. तोपर्यंत हार्बर सेवेचा पुरता बोजवारा उडाला. (प्रतिनिधी)
वडाळा स्थानकात रुळाला तडा
By admin | Published: January 04, 2017 1:39 AM