'धावत्या लोकलवर पुन्हा दगडफेक', तरुणीची ट्विट करून माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:34 AM2018-10-06T01:34:57+5:302018-10-06T01:35:20+5:30
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-डोंबिवली लोकलवर मुंब्रा स्थानक परिसरात झालेली दगड फेकीची घटना नजरेआड होन्यापूर्वी धावत्या लोकलवर पुन्हा दगडफेक झाल्याची माहिती तरुणीने ट्विट करून दिली आहे.
महेश चेमटे
मुंबई : सोनिया श्रीनिवासन या तरुणीने शुक्रवारी दादर ते घाटकोपर स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये दगडफेक झाल्याची माहिती ट्विटच्या माध्यमाने दिली आहे. रेल्वेमंत्री आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुंबई, यांना टॅग केलेल्या ट्विटमध्ये, ' दगडफेकीबाबत 182 आणि 9833111111या क्रमांकाशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. प्रतिसाद मिळत नसेल तर सुरक्षा यंत्रणेच्या आपत्कालीन टोल फ्री क्रमांकाचा काय उपयोग,' अशी प्रतिक्रियाही देण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री 10 वाजून 13 मिनिटांनी केलेल्या ट्विटला मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बल, दादर यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रत्युत्तर देण्यात आले. या ट्विटनुसार, 'दादर हद्दीतील रेल्वे मिडसेक्शनमध्ये आरपीएफ जवान गस्त घालत असून याबाबत काहीही आक्षेपार्ह किंवा रेल्वे रूळादरम्यान जखमी निदर्शनास आलेले नाही. तथापी जखमी प्रवाशांला विनंती आहे की त्यांनी जवळच्या स्टेशन मास्तरशी संपर्क साधून वैद्यकीय उपचार घ्यावे. तसेच स्थानकातील कोणत्याही रेल्वे पोलीस अथवा आर पीएफ शी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. ' या आशयाच्या ट्विटसह अधिकृत ट्विटरहँडलवरून गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानांचा फोटो देखील शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, सोनिया श्रीनिवासन या तरुणीच्या ट्विटरवरील माहिती नुसार, 182 या टोल फ्री क्रमांकावर कोणता कॉल प्रतिसाद देण्यापासून राहिला आहे का ? याचा तपास रेल्वे सुरक्षा बलाकडून करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.