संपाचा फुसका बार!
By admin | Published: May 1, 2015 02:36 AM2015-05-01T02:36:57+5:302015-05-01T02:36:57+5:30
केंद्र सरकारच्या प्रस्तावित रस्ते सुरक्षा विधेयकाविरोधात नॅशनल फेडरेशन आॅफ ट्रान्सपोर्ट वर्कर्सकडून पुकारण्यात आलेला देशव्यापी संप फुसका बार ठरला.
काही तासांतच वाहतूक सुरळीत : मुंबई, ठाणे जिल्हा वगळता राज्यात मिळाला संमिश्र प्रतिसाद
मुंबई : केंद्र सरकारच्या प्रस्तावित रस्ते सुरक्षा विधेयकाविरोधात नॅशनल फेडरेशन आॅफ ट्रान्सपोर्ट वर्कर्सकडून पुकारण्यात आलेला देशव्यापी संप फुसका बार ठरला. परिवहन मंत्र्यांनी दिलेले आश्वासन यामुळे काही तासांतच राज्यात विविध ठिकाणी वाहतूक सुरळीत झाली. मुंबई, ठाणे वगळता राज्यात फारसा फटका बसला नाही.
रस्ते सुरक्षा आणि वाहतूक विधेयकातील टप्पा वाहतुकीमुळे एसटी, रिक्षा, टॅक्सी, बस वाहतुकीला मोठा फटका बसेल, त्यामुळेच गुरुवारी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला होता.
विधेयकाला विरोध असला तरी प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी अनेक संघटना संपात सहभागी झाल्या नाही. दुसरीकडे एसटी संघटनेने छुपा पाठिंबा दिल्याने राज्यातील धुळे, नांदेड, रत्नागिरीतील खेड, पुणे, बारामती येथे एसटी बस बंदच होत्या. मुंबई व ठाणे जिल्ह्यांत मात्र संपाला पाठिंबा मिळालाच नसल्याचे दिसून आले. टॅक्सी व रिक्षा संघटनांनी यातून आधीच माघार घेतली होती. तसेच पोलीस संरक्षणात बेस्ट बस सोडण्यात येत होत्या. त्यामुळे फटका बसला नाही.
च्सकाळी नऊ वाजता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हे विधेयक राज्यात लागू न करण्यास योग्य प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
च्हे विधेयक महाराष्ट्रात लागू केले जाणार नसल्याचे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिल्यानंतर संप मागे घेण्याचा आम्ही निर्णय घेतला.
- उदयकुमार आमोणकर, निमंत्रक, नॅशनल फेडरेशन आॅफ ट्रान्सपोर्ट वर्कर्स