लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बेमुदत संपावर जाण्यावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनेत मतभेद असल्याचे चित्र मंगळवारी समोर आले. राजपत्रित अधिकारी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चेनंतर संप स्थगित केला; मात्र २९ ऑगस्टपासून संपावर जायचे की नाही याबाबतचा निर्णय कर्मचारी संघटना बुधवारी घेणार आहे.
केंद्र सरकारने सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यातील महायुती सरकारनेही त्याच धर्तीवर ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर, कर्मचारी, अधिकारी संघटना २९ ऑगस्टपासूनच्या संपावर ठाम राहणार का? याबाबत उत्सुकता होती.
राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी सांगितले की, सरकारने विधिमंडळात आश्वासन दिले होते की, निवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात जे मूळ वेतन असेल त्याच्या ५० टक्के रक्कम ही निवृत्तिवेतन म्हणून दिले जाईल. या आश्वासनानुसारच निवृत्तिवेतन दिले जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे संप स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेतला.