लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याप्रकरणी १६ जूनपासूनचे नियोजित असलेले कामबंद आंदोलन ३० जूनपर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील यांनी दिली.
प्रधान सचिव विकास खारगे व वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांची संघटनेच्या प्रतिनिधींनी याप्रकरणी मंत्रालयात भेट घेतली. व्यवस्थापकीय संचालकांनी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग शासनस्तरावरून मंजुरी मिळताच तत्काळ देण्यात येईल, असे आश्वासन दिले. संप करू नये अशी विनंतीही केली.
आयोगाचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच ठेवून मंजुरी देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक कृती समितीचे सर्व पदाधिकारी तसेच संघटनेचे सर्व केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या सर्वानुमते आंदोलन ३० जूनपर्यंत स्थगित केले.
.................................