- मनोहर कुंभेजकरे, मुंबईजिओ (जैन इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन)च्या माध्यमातून जैन समाजाला एकत्र करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही संस्थेचे विश्वस्त-संस्थापक व काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मनीष शहा यांनी दिली. ‘लोकमत व्यासपीठ’ या मुलाखतीच्या सदरांत ते बोलत होते.मनीष शहा यांनी सांगितले की, १९५२ साली देशात जैन समाजाचे ५२ खासदार आणि ९८ आमदार होते. आता २०१६ सालाच्या अखेरीस समाजाचा एकही खासदार नसून फक्त दोनच आमदार आहेत. त्यामुळे सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन समाजाची राजकीय ताकद कशी वाढेल, यासाठी जिओ प्रयत्न करीत आहे. अल्पसंख्याक असलेल्या जैन समाजातील गरीब बांधव गरजेपोटी धर्मांतर करीत आहेत. ही चिंतेची बाब असून, त्यांचे जीवनमान आणि आर्थिक स्थैर्य उंचावून धर्मांतर रोखणे हे आमच्यापुढील मोठे आव्हान आहे.जैन समाजातील १० ते २० टक्के उद्योजक सक्षम असले तरी ८० टक्के लघुउद्योजकांना नोटाबंदीचा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. नोटाबंदीमुळे बँक आणि एटीएमसमोर रांगा लागल्या असून, रांगांमुळे नागरिकांचे १ लाख २५ हजार तास वाया गेले आहेत आणि त्यामुळे २ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. सरकारने नोटाबंदी लागू करण्यापूर्वी कोणतीही पूर्वतयारी केली नव्हती. परिणामी, नोटाबंदीचा मोठा फटका मुंबईच्या जनतेला बसला आहे. मुंबई महापालिकेतील सेना-भाजपाच्या कारभाराला मुंबईची जनता कंटाळली आहे. मुंबईच्या जनतेचा आजही काँग्रेसवर विश्वास असून, मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला किमान ८० ते ९० जागा मिळतील, असा विश्वास आहे. निवडणुकीत किमान ९० जागा समाज बांधवांना मिळाव्यात, अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.- जगात जैन समाजाची लोकसंख्या २०१६च्या आकडेवारीनुसार, ४२ ते ४३ लाख, देशात सुमारे ३१ लाख तर महाराष्ट्रात सुमारे १६ ते १७ लाख आहे. जैन समाजाला एकत्र आणून त्यांच्या उद्योग, शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी प्रयत्न सुरू आहे.- विम्याचे संरक्षण मिळण्यासाठी २ लाख १८ हजार जैन बांधवांना विमा काढून देण्यात आला आहे. समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. - देशात २६ टक्के मालमत्ता जैन समाजाच्या मालकीची असून, जैन समाज सुमारे २० हजार कोटी रुपये शैक्षणिक साहित्याच्या उत्पादनाच्या निर्मितीवर खर्च करतो. त्यामुळे जैन समाजातील उद्योजकांनी एकत्र यावे आणि त्याचा फायदा अल्पसंख्याकामध्ये असलेल्या जैन बांधवांना मिळावा यासाठी जिओची स्थापना करण्यात आली आहे.
जिओच्या माध्यमातून जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील
By admin | Published: December 27, 2016 1:55 AM