‘जे जे’ रुग्णालयाच्या स्वायत्ततेसाठी प्रयत्नशील; वैद्यकीय शिक्षण सचिव वाघमारे यांचे सूतोवाच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 10:31 AM2024-05-18T10:31:56+5:302024-05-18T10:37:27+5:30
जे.जे रुग्णालयामध्ये कर्करोगाचा विभाग सुरू करता येईल का, याबाबत विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
मुंबई : जे.जे रुग्णालयामध्ये कर्करोगाचा विभाग सुरू करता येईल का, याबाबत विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यासोबत जे.जे रुणालयाशी संलग्न ग्रॅण्ट शासकीय महाविद्यालय १८० वर्षांची ऐतिहासिक संस्था असून त्याला स्वायत्तता प्रदान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी केले.
ग्रॅण्ट शासकीय महाविद्यालयाने १८० वर्षांत पदार्पण केल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी वाघमारे बोलत होते. त्यांनी पुढे असेही सांगितले की, इथिक्स, इकॉनॉमी आणि इम्पथी यांच्यामार्फत डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेसाठी अहोरात्र मेहनत घ्यावी. यावेळी वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि विविध विभागाचे डॉक्टर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी डॉ. फारुख उडवडिया यांच्या सौजन्याने ग्रॅण्ट शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याला आणि विद्यार्थिनीला मेडिसिन या विषयात विशेष काम केल्याबद्दल डॉ. फारुख उडवडिया हे मेडल देण्यात आले. एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला असणारी कोमल बरडिया या पुरस्काराची मानकरी ठरली. तसेच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे फोटोग्राफीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यामधील विजेत्यांना यावेळी पारितोषिक देण्यात आले. रुग्णालयाच्या स्टाफ नर्स गायत्री मुधीयाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. चित्र सेल्वराज यांना हा पुरस्कार मिळाला. विद्यार्थी वर्गात सुयश कुंभार आणि निवासी डॉक्टर डॉ. तलहा नदीम यांना पुरस्कार देण्यात आले.