Join us

यशासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा

By admin | Published: June 25, 2016 2:18 AM

आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करून ध्येयावर लक्ष केंद्रित करतानाच यशाचे उच्चतम शिखर गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, असे आवाहन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

मुंबई : आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करून ध्येयावर लक्ष केंद्रित करतानाच यशाचे उच्चतम शिखर गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, असे आवाहन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.अंधेरी (प.) येथील एमव्हीएम एज्युकेशन कनिष्ठ महाविद्यालय आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी महाविद्यालयात आयोजित करिअर मेळाव्याला उपस्थित २५० विद्यार्थ्यांशी भालचंद्र मुणगेकर यांनी संवाद साधला; यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य शांतीलाल शहा आणि लोकमतच्या मुंबई आवृतीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर उपस्थित होते.भालचंद्र मुणगेकर म्हणाले, की ९० टक्के पालकांना आपला पाल्य हा डॉक्टर-इंजिनीअर झाला पाहिजे, असे मनापासून वाटत असते. मात्र आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, ते आपणच ठरवले पाहिजे, आपल्या आईवडिलांनी नाही. आपली शिक्षण पद्धती आणि उपलब्ध रोजगार यांचा काही ताळमेळ नाही. देशात बेरोजगारांची फळी निर्माण होत असून, त्यांना रोजगार मिळण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कौशल्य विकासप्रणाली सुरू केली होती याची आठवण मुणगेकर यांनी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना करून दिली. शिवाय पदवी मिळाल्यावर आपल्याला जगण्यासाठी चांगले पैसे मिळवणे हे ध्येय ठेवत ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी खस्ता खात आपल्याला मोठे केले, याची जाणीव ठेवा आणि वृद्धापकाळात त्यांची सेवा करा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.नोकरी करता करता डिप्लोमा करा, मग पदवीचा अभासक्रम पूर्ण करा, असा सल्ला मुणगेकर यांनी दिला. चीनमध्ये तेथील विद्यार्थ्यांसाठी सुमारे ७ हजार विविध डिप्लोमा कोर्सेस आहेत. पदवीनंतर इतर परदेशी भाषा शिका. आपल्याला भाषेची आणि लिखाणाची आवड असेल तर पत्रकारितेमध्ये सुद्धा चांगले करिअर करता येते, असेही ते म्हणाले. कोणतेही काम कमी लेखू नका, असे सांगत आपल्या देशात मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या ९० कोटी आहे. त्यामुळे मोबाइल दुरुस्तीचा कोर्स रोजगार मिळवून देतो, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.यावेळी विनायक पात्रुडकर म्हणाले की, करिअरबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात चुकीच्या कल्पना असतात. कोणते करिअर निवडावे, याबाबत मुले गोंधळलेली असतात. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त जीवन जगताना आपली आवड, आपल्यावरील संस्कार हे आपले करिअर यशस्वी घडवू शकतात, अशी खुणगाठ आपण मनाशी बांधली पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात मेहनतीला पर्याय नाही, असे सांगतानाच पात्रुडकर यांनी पत्रकारितेमध्येही चांगले करिअर करता येते, असे आवर्जून नमूद केले. हेच नमूद करताना वर्तमानपत्रात चांगले पत्रकार मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.शांतीलाल शहा म्हणाले, की लोकमतचा हा उपक्रम स्तुत्य असून, याद्वारे विद्यार्थ्यांना नक्कीच दिशा मिळेल. दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका दर्शना सावंत यांनी केले. (प्रतिनिधी)