केईएममध्ये आता ‘स्ट्रोक क्लिनिक’

By Admin | Published: October 29, 2015 12:15 AM2015-10-29T00:15:27+5:302015-10-29T00:15:27+5:30

स्ट्रोकवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात स्वतंत्र विभाग असतो. आता पालिका रुग्णालयांमध्येही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

'Stroke clinic' now in KEM | केईएममध्ये आता ‘स्ट्रोक क्लिनिक’

केईएममध्ये आता ‘स्ट्रोक क्लिनिक’

googlenewsNext

मुंबई : स्ट्रोकवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात स्वतंत्र विभाग असतो. आता पालिका रुग्णालयांमध्येही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. केईएम पालिका रुग्णालयात प्रथमच जागतिक स्ट्रोक दिनाचे औचित्य साधून ‘स्ट्रोक क्लिनिक’ सुरू करण्यात येत आहे. न्यूरोलॉजी विभागातर्फे हे क्लिनिक सुरू करण्यात येणार असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
स्ट्रोक येतो, त्या वेळी मेंदूतील नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण झालेल्या असतात. त्या गुठळ्या काही तास तशाच राहिल्यास मेंदूच्या कार्य आणि शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे पहिल्या साडेचार तासांत रुग्णाला मेंदूतील रक्ताच्या गुठळ्या विरघळण्याचे इंजेक्शन देणे गरजेचे असते. हे इंजेक्शन दिल्यास मेंदूतील गुठळ्या विरघळून रुग्ण पुढच्या २ ते २४ तासांत सामान्य स्थितीत येऊ शकतो. पण साडेचार तासांत त्याला हे इंजेक्शन मिळाले नाही, तर त्याला बरे होण्यासाठी २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागतो, असे रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता रावत यांनी सांगितले. स्ट्रोकचा रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर त्याचा सीटी स्कॅन करावा लागतो, त्याच्या काही रक्त तपासण्या कराव्या लागतात. त्यानंतर उपचार सुरू केले जातात. सीटी स्कॅनमध्ये त्या रुग्णाला ब्रेन हॅमरेज झालेले नाही ना? हे पहिल्यांदा पाहिले जाते. त्यानंतर त्या रुग्णाचा रक्तदाब, वय, रक्त तपासणी अहवाल तपासले जातात. त्यानंतरच रुग्णाला इंजेक्शन द्यायचे की नाही, हा निर्णय घेतला जातो. यासाठी या क्लिनिकमध्ये न्यूरोलॉजी विभागातील एक डॉक्टर कायमस्वरूपी असेल. त्याबरोबर मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टरही तेथे असतील. आपत्कालीन विभागात स्ट्रोकचा रुग्ण आल्यास तत्काळ क्लिनिकमध्ये त्याला हलवण्यात येईल. तेथे त्याचे सीटी स्कॅन आणि इतर तपासण्या करण्यात येतील. यासाठी न्यूरोलॉजी विभागाजवळच २ ते ३ खाटा राखीव ठेवण्यात आल्याच, असे डॉ. रावत यांनी सांगितले. याआधी केईएम रुग्णालयात आलेल्या ७ स्ट्रोकच्या रुग्णांना आम्ही हे इंजेक्शन दिले आहे. त्या वेळी रुग्णांचा प्रतिसाद चांगला होता. त्यामुळे हे विशेष क्लिनिक गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Stroke clinic' now in KEM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.