आरोपी अक्षय शिंदेच्या विरोधात भक्कम पुरावे, बदलापूरप्रकरणी एसआयटी चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 01:31 PM2024-09-01T13:31:56+5:302024-09-01T13:33:32+5:30
Badlapur Case; बदलापूर येथे एका शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेविरुद्ध एसआयटीने चौकशी सुरू केली आहे. त्यात चौकशी समितीला आरोपी शिंदेविरुद्ध मजबूत पुरावे मिळाल्याची माहिती आहे.
मुंबई - बदलापूर येथे एका शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेविरुद्ध एसआयटीने चौकशी सुरू केली आहे. त्यात चौकशी समितीला आरोपी शिंदेविरुद्ध मजबूत पुरावे मिळाल्याची माहिती आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे.
न्यायालयात खटला उभा राहील, तेव्हा घटनेच्या दिवशी मी शाळेतच नव्हतो, अशी भूमिका अक्षय शिंदे घेऊ शकणार नाही. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज जरी उपलब्ध झाले नसले, तरी शाळेच्या मार्गातील वेगवेगळे फुटेज एसआयटीने गोळा केले आहे. त्यातून आरोपी अक्षय शिंदे घटनेच्या दिवशी शाळेत येताना आणि घटनेनंतर शाळेतून जाताना रेकॉर्ड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
अक्षयची पार्श्वभूमीदेखील एसआयटीने तपासल्याचे समजते. त्याने तीन लग्न केली. पहिली बायको त्याला तीन दिवसात सोडून गेली. दुसरी पत्नीही चार दिवसांत सोडून गेली. त्यातल्या एका पत्नीचा जबाब एसआयटीने घेतला असता तिने अक्षय हा विकृत असल्याने विवाहानंतर पाच दिवसांत माहेरी निघून गेल्याची कबुली दिली आहे.
'त्या' मुलींनी आरोपीला ओळखले
चौकशी समितीने आरोपीची ओळख परेडही केली. त्यात शाळेतील मुलींनी त्याला ओळखल्याचेही समजते. आरोपी अक्षय ज्या-ज्या दिवशी शाळेत आला त्याच्या वेळा आणि शाळेतून जातानाच्या वेळादेखील फुटेजमधून एसआयटीला मिळाल्या आहेत. ज्या मुलींवर अत्याचार झाला त्या मुलीही त्या दिवशी शाळेत किती वाजता आल्या आणि किती वाजता गेल्या हेही एसआयटीने शोधले आहे. • तपासाबाबत एसआयटी काहीही बोलायला तयार नाही. मात्र, आतापर्यंत १८ लोकांची चौकशी आरती सिंग यांच्या टीमने केल्याची माहिती आहे.
आरोपीकडून होणारा लैंगिक छळ याविषयी एका पत्नीने माहिती दिली. त्याची वागण्याची पद्धत विकृत होती, याचे अनेक पुरावे समितीला मिळाले आहेत. त्यामुळे आरोपीवर गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे जमा झाले आहेत. मात्र, आमची टीम अजूनही प्रत्येक गोष्ट तपासून घेत असल्याचे एसआयटीच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.