लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे. घरगुती हिंसाचाराविरोधात जमात-ए-इस्लामी हिंद (जेआयएच) च्या महिला विभागात १९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ‘‘मजबूत कुटुंब मजबूत समाज’’ देशव्यापी अभियान राबविले जाणार आहे. याबाबतची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.
यावेळी मोहिमेच्या राष्ट्रीय संयोजक शाइस्ता रफत, जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग सचिव साजिदा परवीन साहिबा, महिला जमात इस्लामी हिंद सचिव मुमताज नजीर साहिबा उपस्थित होत्या. मोहिमेच्या राष्ट्रीय संयोजक शाइस्ता रफत म्हणाल्या की, महिलांच्या राष्ट्रीय आयोगाने अलीकडेच लॉकडाऊनदरम्यान घरगुती हिंसाचारात झपाट्याने वाढ नोंदविली. इतर सर्वेक्षण अहवालात असे नमूद केले गेले आहे की, घरगुती हिंसाचारात दहा वर्षांचा उच्चांक आहे. ही संख्या खरं तर जास्त आहे. घटस्फोटाचे प्रमाणही वाढले आहे आणि कौटुंबिक कलहाचे प्रमाणही अगणित आहेत. स्त्रियांवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार होत आहेत. अत्याचाराच्या घटना खूप सामान्य आहेत. आमची मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनाही विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज तरुणांना विवाह आणि कौटुंबिक जीवनातील जबाबदाऱ्या नकोशा वाटतात आणि त्यांना मातृत्व आणि पितृत्वाची जबाबदारी नकोशी वाटते, असे त्या म्हणाल्या.
त्यापुढे म्हणाल्या की, आम्ही घरगुती हिंसाचार विरोधात ‘‘मजबूत कुटुंब मजबूत समाज’’ देशव्यापी अभियान राबवित आहोत. आम्हाला मुस्लीमसह सर्व समाजसाठी लढा उभारायचा आहे. तळागाळातील घटकासाठी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम घेणार आहोत. आम्ही संवाद, कौटुंबिक कार्यक्रम, आंतरधार्मिक संवाद, आंतरराष्ट्रीय वेबनॉरर्स, वकील, कौटुंबिक सल्लागार आणि प्रशिक्षकांशी पॅनेल चर्चा, तज्ज्ञांशी रोजचे संवादात्मक सत्रे, शुक्रवारी प्रवचन, गटचर्चा आदी कार्यक्रमांचे आयोजन करणार आहोत. या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी समाजाचे नेते, मशिदी इमाम आणि विविध धार्मिक अभ्यासकांना पत्रे पाठविली जातील.