मुंबई : प्रयोगशाळा सहायकांची २२ रिक्त पदे भरण्याबाबत महापालिका प्रशासनाने जाहिरात प्रसारित केली आहे. मात्र, प्रयोगशाळा सहायकांची पदे कार्यरत प्रयोगशाळा परिचर यांच्यामधून पदोन्नतीने भरली जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ही पदोन्नतीची पदे रिक्त आहेत, याबाबत कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा आणि पत्रव्यवहार केला. मात्र, तरीही प्रशासनाने दाद दिली नसल्याने आता कंत्राटी पद्धतीने करण्यात येणाऱ्या पदभरतीला विरोध केला असून, याबाबत म्युनिसिपल मजदूर युनियन संघटनेच्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे.
पदोन्नतीची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास आमचा ठाम विरोध आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच प्रशासनाच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून प्रयोगशाळा परिचर आपले काम सांभाळून प्रयोगशाळा सहायक पदाची कामे करत आहेत; मात्र प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना पदोन्नती न देता कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची जाहिरात काढली आहे. प्रशासनाने कंत्राटी कामगारांची अन्यायकारक भरती रद्द करावी, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहायक सरचिटणीस प्रदीप गोविंद नारकर यांनी केली आहे. प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
अधिष्ठातांना भेटणार
पदोन्नतीच्या पदावर कंत्राटी पद्धतीने भरती करण्यास आमच्या संघटनेसह अन्य कामगार, कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून अधिकचा मोबदला न घेता प्रयोगशाळा परिचर काम सांभाळून सहायक पदाचीही कामे करत आहेत. मात्र, प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना डावलून कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे परिपत्रक काढल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष पसरलेला आहे. याबाबत २७ मार्चला नायर रुग्णालयाच्या आवारात सर्व कर्मचारी ही भरती रद्द करण्याची मागणी करत अधिष्ठात्यांची भेट घेणार असल्याचे नारकर यांनी सांगितले.