Join us

ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 3:43 PM

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेतील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यात मुंबईतील आमदार, पदाधिकारी यांचाही समावेश होता. मुंबईतील अनेक माजी नगरसेवक शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

प्रविण मरगळे

मुंबई - विधानसभा निवडणूक तोंडावर असताना मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या निकालानं मुंबईतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. विद्यापीठाच्या या निवडणुकीत आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वात युवासेनेने १० पैकी १० जागा जिंकून विरोधकांना शह दिला आहे. या निवडणुकीपूर्वी सिनेटचे ५ सदस्य ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले होते. मात्र त्याचा फारसा परिणाम ठाकरेंच्या युवासेनेवर पडला नसल्याचं निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले. 

विशेष म्हणजे, सिनेट निवडणुकीत युवासेनेने भाजपाप्रणित अभाविपचा धुव्वा उडवला. युवासेनेच्या सर्व उमेदवारांनी ठरवलेल्या कोट्याहून अधिक मते मिळवली तर अभाविपच्या उमेदवारांना हजाराहून कमी मतात गुंडाळून ठेवले. सिनेटच्या निवडणुकीत एकूण २८ उमेदवार रिंगणात होते. त्यात मनसेच्या अपक्ष उमेदवारानेही अर्ज भरला होता. सिनेटची निवडणूक दोनदा स्थगित करण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या वेळेला काही विद्यार्थी संघटनांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने या निवडणुकीला स्थगित देता येणार नाही असं सांगत विद्यापीठ प्रशासनाचे कान टोचले. 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेतील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यात मुंबईतील आमदार, पदाधिकारी यांचाही समावेश होता. मुंबईतील अनेक माजी नगरसेवक शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद कमी करण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे. मात्र आधी शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक आणि विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका याचे निकाल पाहिले तर मुंबईतील उच्चशिक्षित पदवीधरांमध्ये अद्यापही ठाकरेंबद्दल आत्मीयता आहे, असंच चित्र दिसतं. त्यातूनच मुंबईतील शिक्षक, पदवीधरसह आता सिनेट निवडणुकीतील निकालामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास बळावला आहे. 'सिनेट तो झाकी है, विधानसभा अभी बाकी है', अशी घोषणा देत ठाकरेंच्या शिलेदारांनी मुंबईत विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे. 

"सिनेट निवडणुकीतील हा विजय २०१८ पेक्षाही मोठा आहे. कारण यावेळी आमच्या ९ उमेदवारांनी कोटा मोडून अधिकची मते घेतली. झालेल्या एकूण मतदानापैकी ८५ टक्के मतदान युवासेनेला झाले. गेल्या २ वर्षात अनेक लोक युवासेनेला सोडून गेले. आमच्यातील ५ सिनेट सदस्यही पक्षातून बाहेर गेले. त्या लोकांचे कर्तृत्व काय हे आता मुख्यमंत्र्यांना कळून चुकलं असेल. खरी युवासेना ही आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील आहे. सिनेट निवडणुकीतील मोठा मतदार मुंबईच्या भागातला होता. त्यामुळे विधानसभेला या निकालाचे नक्कीच पडसाद उमटतील", अशी प्रतिक्रिया युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केली.

सुशिक्षित मतदारांचा कल ठाकरेंच्या पाठिशी

मुंबईत नुकत्याच झालेल्या पदवीधर विधान परिषद निवडणुकीतही उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी ७५ टक्के मते घेत विजय मिळवला. सिनेटमध्येही हाच निकाल पाहायला मिळाला. या दोन्ही निवडणुकांमध्ये उच्चशिक्षित पदवीधर मतदान करतात. त्यामुळे सामान्य निवडणुकीतही हे मतदान ट्रान्सफर होण्याची शक्यता अधिक असते. या निवडणुकीत आमच्या बाजूने निर्णायक मतदान झाले, खुल्या गटातील आमच्या चारही उमेदवारांनी कोटा तोडला आणि पाचव्या उमेदवाराने जी मते घेतली तेवढी भाजपाच्या पाचही उमेदवारांची बेरीज करूनही तिथे पोहचू शकले नाहीत, असा टोला वरूण सरदेसाईंनी महायुतीला लगावला. 

शिंदे गटात अस्वस्थता

मुंबईतील काही मोजके आमदार वगळता इतरांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यासोबत माजी नगरसेवकही मोठ्या प्रमाणात शिंदेसोबत गेले आहेत. परंतु शिक्षक, पदवीधर आणि आता सिनेट निवडणुकीच्या निकालाने अनेकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सिनेट निवडणुकीच्या निकालात सपाटून मार खाल्ल्यानंतर काही शिंदेच्या युवासेनेचे पदाधिकारी पुन्हा एकदा ठाकरेंच्या युवासेना पदाधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याचीही माहिती समोर येत आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेवरुण सरदेसाईआदित्य ठाकरेउद्धव ठाकरेशिवसेनामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४