मुंबईची होणारी तुंबई टाळण्यासाठी मनपाची जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 09:23 AM2024-01-19T09:23:35+5:302024-01-19T09:24:39+5:30
पश्चिम उपनगरांतील कामांसाठी पालिकेने जारी केल्या ५० कोटींच्या निविदा.
मुंबई : पावसाचे पाणी साचण्यापासून उपनगरांना दिलासा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नाले रुंदीकरण, खोलीकरण आदी कामे हाती घेतली असून विविध नाल्यांची रुंदी वाढविणे, खोलीकरणाचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्व उपनगरांतील कामांसाठी पालिका साडेअठरा कोटींचा खर्च करणार आहे. याआधी पश्चिम उपनगरांतील कामांसाठी पालिकेने ५० कोटींच्या निविदा जारी केल्या आहेत.
पावसाळ्यात, अतिवृष्टी आणि भरतीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने उपाययोजनांची कार्यवाही सुरू केली आहे. यंदा पूर्व उपनगरांसह, पश्चिम उपनगरांतील सखल भागांत पाणी साचण्यापासून दिलासा मिळावा म्हणून काही नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण केले जाणार असून पर्जन्य जलवाहिन्यांचा विस्तार तसेच बॉक्स रचना असलेल्या आरसीसी पद्धतीच्या नाल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी पालिकेने निविदा मागवल्या येत्या ८ ते १० महिन्यांत काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्याआधी पश्चिम उपनगरांतील सर्व ठिकाणी पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा होऊन जनतेला दिलासा मिळेल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. मुंबईत अतिवृष्टीमुळे दरवर्षी सखल भागांत पाणी साचते. काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून पालिका पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे अधिक सक्षम करण्याचे काम करत आहे.
यामुळे पालिकेवर टीकेचा भडिमार :
दरवर्षी जागोजाग पावसाचे पाणी साचून मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडते. त्यामुळे पालिकेवर टीकेचा भडिमार होतो.
पाण्याचा निचरा जलदगती व्हावा म्हणून दरवर्षी ४०० हून अधिक पाणी उपसा करणारे पंप बसविले जातात तसेच दादर, परळ, मिलन सब वे भागात पाणी साठवण करणाऱ्या भूमिगत टाक्या बसविल्या आहेत.
याबरोबरच आता मुंबईच्या विविध भागांतील नाल्यांकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार पश्चिम उपनगरांतील नाल्यांची रुंदी वाढवणे, खोलीकरणाचे काम केले जाणार आहे.
पूर्व उपनगरांतील बांधकामासाठी पालिका १८ कोटी ५३ लाख करणार आहे.
या आधीही पश्चिम उपनगरातील पाली गाव, वांद्रे पश्चिम, शेर्ली राजन व्हिलेज, गोरेगाव येथील विविध कामे.
नाल्यांचे पुनर्बांधकाम, रूंदीकरण आणि ड्रेनेज बॉक्स दुरुस्तीसाठी पालिकेकडून सुमारे ५० कोटींची निविदा प्रक्रिया करण्यात आली.