इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट ही काळाची गरज: गृहनिर्माणतज्ज्ञ रमेश प्रभू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:37 AM2017-09-09T03:37:06+5:302017-09-09T03:37:48+5:30
घाटकोपर आणि भेंडी बाजार येथे नुकत्याच घडलेल्या दोन इमारती कोसळण्याच्या घटनेत, निष्पाप जिवांचा नाहक बळी गेला. यामुळे पुन्हा एकदा स्ट्रक्चरल आॅडिटचा मुद्दा ऐरणीवर आला असून, स्ट्रक्चरल आॅडिट ही काळाची गरज आहे
मुंबई : घाटकोपर आणि भेंडी बाजार येथे नुकत्याच घडलेल्या दोन इमारती कोसळण्याच्या घटनेत, निष्पाप जिवांचा नाहक बळी गेला. यामुळे पुन्हा एकदा स्ट्रक्चरल आॅडिटचा मुद्दा ऐरणीवर आला असून, स्ट्रक्चरल आॅडिट ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ गृहनिर्माणतज्ज्ञ रमेश प्रभू यांनी ‘लोकमत’कडे मांडले. जुन्या इमारतींची वास्तविक स्थिती समजण्यासाठी स्ट्रक्चरल आॅडिट हे एक महत्त्वाचे साधन आहे. आॅडिट हे इमारतीतील सर्व धोक्याची क्षेत्रे आणि इमारतीला तातडीची दुरुस्तीची गरज आहे किंवा नाही, यावर प्रकाश टाकते. स्ट्रक्चरल आॅडिटमुळे मालमत्ता व जीव वाचतात, असेही प्रभू यांनी नमूद केले.
स्ट्रक्चरल आॅडिट केल्यामुळे इमारतीचे भविष्यातील अंदाजित जीवनमान कळते. परिणामी, इमारतीचा एखादा भाग तातडीने दुरुस्त करावयाचा असल्यास, तो करता येतो व इमारतीचे आयुष्य वाढते. मुंबईतील इमारतींची दुरवस्था विचारात घेऊन, मुंबई महापालिकेने अधिनियमात सुधारणा करून, नवीन ३५३-ब कलम दाखल केले, ज्यात इमारतीच्या मालकांनी/गृहनिर्माण संस्थांनी जर त्यांच्या इमारती ३० वर्षांपेक्षा जुन्या असतील, तर स्ट्रक्चरल आॅडिट करणे अनिवार्य केले आहे. कोणीही व्यक्ती महापालिकेच्या स्थानिक विभाग अधिकाºयाकडे कलम ३५३-ब अन्वये स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी, इमारतीच्या मालकाला/गृहनिर्माण संस्थेला नोटीस काढण्यासाठी तक्रार अर्ज करू शकते. महापालिकेकडून अशी नोटीस प्राप्त झाल्यानंतर, मालकाने/गृहनिर्माण संस्थेने ३० दिवसांच्या आत स्ट्रक्चरल आॅडिट करून, त्याचा अहवाल महापालिकेला सादर करणे अनिवार्य आहे. स्ट्रक्चरल आॅडिट हे पालिकेच्या नाम तालिकेवरील अभियंत्यांकडून करवून घेणे बंधनकारक आहे, असेही रमेश प्रभू यांनी सांगितले.