पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे होणार स्ट्रक्चरल आॅडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:23 AM2018-03-19T02:23:39+5:302018-03-19T02:23:39+5:30
पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक असलेल्या केईएम रुग्णालयातील डायलिसिस विभागातील फॉल्स सिलिंगच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याच्या दुर्घटनेची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे.
मुंबई : पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक असलेल्या केईएम रुग्णालयातील डायलिसिस विभागातील फॉल्स सिलिंगच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याच्या दुर्घटनेची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. त्यानुसार पालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त आय.ए. कुंदन यांनी आरोग्य विभागाला दिले.
केईएम रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील डायलिसिस विभागात हा अपघात बुधवारी घडला. या दुर्घटनेत डायलिसिस विभागातील दोन रुग्ण किरकोळ जखमी झाले होते. मात्र या दुर्घटनेनंतर केईएमच्या सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी होत होती. पालिका रुग्णालयाच्या आवारात दररोज रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची गर्दी असते. अशी एखादी घटना कर्मचारी व रुग्णांसाठीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पालिकेच्या प्रमुख रुग्णालयातील सर्व इमारतींचेच स्ट्रक्चरल आॅडिट करून घ्यावे, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी अतिरिक्त आयुक्त आय.ए. कुंदन यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. ही मागणी मान्य करीत त्यांनी पालिकेच्या सर्वच प्रमुख रुग्णालयांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभाग आणि आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना दिले आहेत.
>आवश्यक उपाययोजनांचा अहवाल देणार
पालिकेच्या केईएम, नायर, सायन या तिन्ही प्रमुख रुग्णालयांचे तीन वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले आहे. मात्र, आता पुन्हा एकदा स्ट्रक्चरल आॅडिट करून घेतले जाणार आहे. त्याकरिता वरिष्ठ अभियंत्यांचे पथक
तयार करण्यात आले आहे. हे पथक रुग्णालयांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून आवश्यक सर्व उपाययोजनांचा अहवाल सादर करणार आहे.