पालिका शाळांचे स्ट्रक्चरल आॅडिट लांबणीवर
By admin | Published: December 3, 2014 11:21 PM2014-12-03T23:21:46+5:302014-12-03T23:21:46+5:30
शहरातील धोकादायक इमारतींबरोबरच शाळा इमारतीदेखील धोकादायक ठरत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांंचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याच्या सूचना आयुक्त असीम गुप्ता यांनी दिल्या होत्या.
अजित मांडके, ठाणे
शहरातील धोकादायक इमारतींबरोबरच शाळा इमारतीदेखील धोकादायक ठरत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांंचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याच्या सूचना आयुक्त असीम गुप्ता यांनी दिल्या होत्या. यात महापालिका शाळांचे आॅडिट पालिकेने आणि खाजगी शाळांचे आॅडिट त्यांनी स्वत: करायचे होते. त्यानुसार, पालिकेने आतापर्यंत १५ शाळांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले असून त्यातील एकही शाळा धोकादायक नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, उर्वरित शाळांचे आॅडिट करण्यासाठी निधीची कमतरता भासत असल्याने या शाळांचे आॅडिट लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे खाजगी शाळांपैकी एकही शाळा सद्य:स्थितीत धोकादायक नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी आयुक्तांनी एका पत्रकार परिषदेद्वारे महापालिकेच्या आणि खाजगी शाळांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पालिकेच्या प्रभाग समितीअंतर्गत असलेल्या कार्यकारी अभियंत्यांनी खाजगी शाळांचे स्ट्रक्टरल आॅडिट करण्यासंबंधी नोटिसा खाजगी शाळांना बजावल्या होत्या. तसेच, शाळा धोकादायक असल्याच्या नोटिसा पालिकेने बजावल्या होत्या. त्यानुसार, राममारुती रोडवरील न्यू गर्ल्स स्कूलची इमारत पाडण्यात आली आहे. तसेच उर्वरित शाळांचे स्ट्रक्टरल आॅडिट पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला असून त्यातील एकही शाळा आता धोकादायक नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.