मुंबई : नवजात मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आर. एन. नर्सिंग होमचा बोगस डॉक्टर मेहताब, परिचारिका सॉलिया राजू खान (२८) यांच्यासह नर्सिंग होमचा चालक अल्ताफ जाकीर खान (२२) यांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातच बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.
मात्र, कारवाईच्या भीतीने बोगस डॉक्टर मेहताब व परिचारिका सॉलिया हिने मृत मुलीला आजीच्या हातात देत उपचारासाठी अन्य रुग्णालयात नेण्यास सांगितले होते. नातीचा जीव वाचेल, या भाबड्या आशेने मृत नातीला कुशीत घेऊन आजीने धावपळ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस अधिक तपास करत आहेत.
मूळचे नागपूरचे रहिवासी असलेले टॅक्सी चालक सोहेल हुसेन (२८) यांच्या कुटुंबीयांसोबत ही दुर्दैवी घटना घडली आहे. जुलैपासून त्यांची पत्नी राबिया शिवाजी नगर येथील नर्सिंग होममध्ये उपचार घेत होती. १७ डिसेंबरला प्रसूतीत चुकीच्या उपचारामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाला. मात्र त्यांनी बाळाला एनआयसीयूमध्ये दाखल करण्यास सांगितले. बाळाला ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी ऑक्सिजन मास्क व रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नव्हती.
रुग्णालयाचा चालक निघाला विद्यार्थी शिवाजी नगर पोलिसांनी मेहताबसह सॉलियाला अटक केली आहे. परिचारिका दहावी पास तर रुग्णालयाचा चालक अल्ताफ आयुर्वेदिक शाखेच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असल्याचे उघड झाले आहे. न्यायालयाने तिघांना २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मृत्यूनंतरही धावपळ राबिया यांच्या आई आणि बहिणीने बाळाला कुशीत घेत आधी मुस्कान रुग्णालय आणि तेथून राजावाडी रुग्णालय गाठले. मात्र राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाळाला मृत घोषित करण्यात आले. मुळात बाळ मृत झाले असताना रुग्णालयावर ठपका येऊ नये म्हणून डॉक्टर मेहताबने खरे सांगितले नाही, असा आरोप बाळाचे वडील सोहेल यांनी केला आहे.