Join us

कोरोनाबाधित असतानाही बाहेरगावी जाण्याची धडपड; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:07 AM

खारमधील प्रकारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असतानाही खार परिसरातील दाम्पत्याने बनावट अहवाल सादर करून बाहेरगावी ...

खारमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असतानाही खार परिसरातील दाम्पत्याने बनावट अहवाल सादर करून बाहेरगावी जाण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खार पोलिसांनी मंगळवाऱी या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पालिकेच्या एच वेस्ट वॉर्ड मध्ये कोविड १९ सेलमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर ओमप्रकाश जैस्वाल (३६) यांनी केलेल्या तक्रारीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी खारमधील दाम्पत्य आणि त्यांच्या १५ वर्षांच्या मुलीने थायरोकेअर लॅबरोटरीजमध्ये कोरोना चाचणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत पालिकेला माहिती मिळताच, २७ फेब्रुवारी रोजी त्यांनी संबंधित कुटुंबीयांना कॉल करून अहवालाबाबत चौकशी केली. तेव्हा त्यांनी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगत, तो व्हॉट्सॲपवर पाठवला. तसेच जयपूरची फ्लाईट असल्याने आपण विलेपार्ले विमानतळावर असल्याचे सांगितले. मात्र अहवालाबाबत संभ्रम निर्माण झाल्याने जैस्वाल यांनी त्यांना घरी जाण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाबाधित असतानाही त्यांनी खार ते विलेपार्ले विमानतळ असा प्रवास केला. शिवाय बनावट अहवाल सादर केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

..........................