Congress Varsha Gaikwad ( Marathi News ) : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली असली तरी महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांमध्ये काही जागांवरून संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे. सांगली लोकसभा मतदारसंघावरून या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता मुंबईतील एका जागेवरूनही वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मागील काही वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला ठरलेल्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी निवडणूक लढवावी, यासाठी पक्षनेतृत्वाकडून आग्रह केला जात असल्याचे समजते.
शिवसेनेतील फुटीनंतर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणं पसंत केलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढवणार, याबाबतचा सस्पेन्स आहे. असं असतानाच निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वर्षा गायकवाड यांना अनुकूल स्थिती असल्याचं सांगत काँग्रेस हायकमांडकडून त्यांना उमेदवारी देण्याबाबत आग्रह केला जात असल्याची माहिती आहे. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, मागील दोन टर्मपासून या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार निवडून आलेला असताना उद्धव ठाकरे ही जागा सहजासहजी काँग्रेसला सोडणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मात्र काँग्रेसकडून खरंच वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी हट्ट करण्यात आल्यास महाविकास आघाडीत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.
मागच्या निवडणुकीत कोणी-किती मते घेतली?
२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे उमेवार राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. या निवडणुकीत राहुल शेवाळे यांना 4 लाख 24 हजार 913 मते पडली होती, तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना 2 लाख 72 हजार 774 मते पडली होती.