विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर करण्यासाठी भरली जत्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 05:53 AM2019-12-22T05:53:00+5:302019-12-22T05:53:24+5:30

संडे अँकर । राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने आयोजन; गणितीय संकल्पना सोप्या करून शिकवण्याचा प्रयत्न

 Struggle to overcome the fear of mathematics among students | विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर करण्यासाठी भरली जत्रा

विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर करण्यासाठी भरली जत्रा

googlenewsNext

मुंबई : गणित म्हटले की, अजूनही बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. गणिताचा पेपर म्हटले की, काही विद्यार्थ्यांच्या पोटात कळ येऊन ढोपर दुखायला लागते, पण शाळेत आणि दैनंदिन व्यवहारासाठीही गणित येणे गरजेचे आहे. मग गणिताशी गट्टी का नको? असा सवाल आत्मविश्वासाने करत, पाचवीच्या इयत्तेतील चिमुरडी वृंदा गणिताचे महत्त्व पटवून देते, तेव्हा ते मान्य करावेच लागते. वृंदा आपल्याला भेटते, ती गणिताच्या जत्रेत. कारण २२ डिसेंबर, राष्ट्रीय गणित दिनाच्या निमिताने जोगेश्वरी, पूर्व येथील अस्मिता विद्यालयात गणिताची जत्रा भरली आहे.

या निमित्ताने कृतीतून शिक्षण या तत्त्वावर गणिताची भीती मुलांच्या मनातून कमी करण्यासाठी आणि तणावमुक्त अभ्यासासाठी लहानग्यांनी गणितीय संकल्पना साध्या, सोप्या पद्धतीने समजून घेतल्या व समजावून सांगितल्या. दैनंदिन जीवनात अंकगणिताचा उपयोग आपल्याला सतत होतो असतो. सुतारकाम किंवा शेतीच्या कामात, अगदी घराचे मोजमाप करण्यात आपल्याला भूमिती मदत करत असते. बँकेत केलेल्या गुंतवणुकीवर किती चक्रवाढ व्याज मिळेल, इथपासून ते गृहकर्जावर किती हप्ता बसेल, या सर्वांचे ठोकताळे बांधण्यासाठी गणिताचा उपयोग होतो. म्हणून शालेय स्तरावर गणित चांगले असणे हे भविष्यात उपयुक्त ठरते. राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने अस्मिता विद्यालयात २० ते २१ डिसेंबर दरम्यान गणिताची जत्रा भरविण्यात आली आणि पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी बेरीज, वजाबाकीसारख्या साध्या संकल्पनांपासून ते समांतर रेषेचा गुणधर्म, गणितीय खेळ, त्यातील गमतीजमती, प्रमेय, आकृत्या, समीकरणे, पृष्ठफळ, वर्गमूळ, घन यांसारख्या संकल्पनांवर प्रकल्प मांडले. गणित हा विषय हा अनुभव आणि सरावातून चांगल्या प्रकारे पक्का होत
जातो. गणित येण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. सराव आणि विषयावरील प्रेम हे अवघड गणित नक्कीच सोपे करते. एखादा चित्रपट पाहताना जसे मन रमवून आपण तो पाहतो आणि मग संक्षिप्त रूपात तो इतरांना सांगतो, तसेच गणिताचे असल्याची प्रतिक्रिया आठवीत शिकणाºया हर्ष खेकर याने दिली. इष्टिकाचितीचे आणि चौरसाचे घनफळ सोप्या पद्धतीने कसे काढले जाऊ शकते, या संकल्पनेवर आधारित प्रकल्प त्याने मांडला होता. शिक्षकांचा पूर्ण सहभाग आणि विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून मदत मिळत होती. संस्थेचे विश्वस्त जगदीश सामंत व सुनील जाधव यांच्या संकल्पनेतून या गणितीय जत्रेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले.

विद्यार्थ्यांना गणित या विषयाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी अशा जत्रा अधिक संख्येने भरविल्या जाव्यात, असे मत पालकांनी व्यक्त केले, तर या जत्रेत विद्यार्थी उत्साहाने सहभागी होत असून, हसतखेळत शिक्षणाचा हा नवा पर्याय आहे, अशी प्रतिक्रिया अस्मिता विद्यालयाच्या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष फडतरे यांनी दिली. त्यामुळे आता गणिताचा पेपर असला तरी, मुले घाबरणार नाहीत, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली.

गणितीय संकल्पना झाल्या सोप्या
जत्रेमध्ये तयार करण्यात आलेले खेळ, संख्यावरील क्रिया समजून घेण्यासाठी दांडे सुटे, नोटा, संख्या तुला वापरून मुलांनी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया कशा करायच्या,
हे जाणून घेतल्या. भौमितिक आकार व त्याचे गुणधर्म समजून घेण्यासाठी जिओ बोर्ड, जोडो स्ट्रॉ, अपूर्णांक किट, तराजू, वजनकाटा, मीटर टेप, दैनंदिन जीवनातील गणिताचा वापर अशा अनेक बाबी त्यांनी शैक्षणिक साहित्यातून अभ्यासल्या. हे सर्व साहित्य विद्यार्थ्यांनीच तयार केले असून, इतर विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास केला. यामुळे गणितीय संकल्पना सोप्या झाल्याच्या प्रतिक्रिया जत्रेला भेट देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी दिल्या.

Web Title:  Struggle to overcome the fear of mathematics among students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.