मुंबई : पोलीस आणि नागरिक यांच्यातील नाळ अधिक घट्ट करत, पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी कॅनडातील पोलीस अधिकारी सत्यानंद गायतोंडे यांची धडपड सुरु आहे. आतापर्यंत १०० हून अधिक सेमिनार त्यांच्याकडून राबविण्यात आले आहेत. विविध संस्थाकडून त्यांच्या कार्याची दखल घेत वेळोवेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला आहे.
मूळचे मुंबईचे रहिवासी असलेले सत्यानंद गायतोंडे (५३) हे कॅनडा येथे नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये एजंट म्हणून कार्यरत आहेत. २०१६ मध्ये वडिलांचे निधन झाले. भारतीय पोलिसांना जगातील सर्वोकृष्ट पोलीस ठरविण्यासाठी धडपड सुरू केली. तत्कालीन पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसळगीकर यांची भेट घेत त्यांना पोलिसांसाठी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटबाबत मार्गदर्शन करण्याबाबतची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार, सुरुवातीला मुंबईतील वाहतूक पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी लेक्चरर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. या सेमिनार अंतर्गत पोलिसांनी नागरिकांशी कसे वागावे, नागरिक आणि पोलीस यांच्यातील तफावत कशी कमी होईल, कामाचे नियोजन कसे करावे, स्वतःला सकारात्मक कसे ठेवावे यासह पोलिसांचे मनोबल वाढविण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
गायतोंडे यांनी मानसशास्त्रामध्ये पदवी घेतली आहे. त्यामुळे याचा फायदा यात झाल्याचे ते सांगतात. गायतोंडे सांगतात, एका सहकारी पोलिसाच्या आत्महत्येनंतर भारतीय पोलिसांसाठी काहीतरी करण्याचे ठरवले. तसेच वडिलांनाही देशासाठी काहीतरी करण्यासाठी दिलेले वचनही पूर्ण करायचे आहे. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर हा प्रवास सुरू झाला. मुंबईतल्या सेमिनारनंतर नाशिक पोलिसांकडून बोलावण्यात आले. नाशिक पाठोपाठ पुणे, ठाणे, दिल्लीत सेमिनार पार पडले. मरोळमध्ये सलग १६ सेमिनार पार पडले आहे. विमानतळावर उतरल्यानंतर परदेशी नागरिकाला तेथे बंदोबस्ताला असलेल्या अंंमलदाराशी पहिला संपर्क येतो. अशावेळी ग्राऊंड लेव्हलपासून हे कार्य सुरू केले आहे. जगभरात हे सेमिनार सुरू आहेत. यापैकी भारतात १०० सेमिनार पार पडले आहेत. नवी मुंबई आयुक्तालयात त्यांचे १०० वे सेमिनार पार पडले होते. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.
२०१९ मध्ये स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीमुळे सेमिनारला ब्रेक लागला. पुढे कोरोनामुळे अडचणी निर्माण झाल्या. मात्र लवकरच हे सेमिनार पुन्हा सुरू करत, शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य सुरु राहणार असल्याचेही ते सांगतात.