लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रात्रीच्या सुमारास खोलीत शिरलेल्या सुरक्षारक्षक ओमप्रकाश कनोजियाची शिकार ठरलेल्या तरुणीने आरोपीला प्रतिकार केला. शेवटच्या श्वासापर्यंत तिची जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू होती. अखेर, कनोजियाने लेगिन्सने गळा आवळून तिची हत्या केली. या घटनेने सर्वांनाच सुन्न केले असून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वसतिगृहातील मुलींनी सांगितलेल्या वस्तू काळवेळ न बघता आणून देत असल्याने मुली ओमप्रकाशला सहजपणे त्यांच्या खोलीत प्रवेश देत होत्या. हेच त्या पीडित मुलीच्या अंगाशी आल्याचेही समोर येत आहे. मात्र, याबाबत पोलिस अधिक तपास करत असून नेमका घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलीने सुरक्षारक्षकाला प्रतिकार केल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर, मानेवर जखमा आढळून आल्या. ओमप्रकाशला जोरदार विरोध केल्याचे तिच्या मृतदेहावरील व्रण आणि जखमांतून तसेच खोलीत सापडलेल्या अन्य पुराव्यांतून स्पष्ट झाले आहे.
मोबाइल सोडून तो गेला
पीडित मुलगी रात्री अकराच्या सुमारास वसतिगृहात परतली. त्यानंतर आरोपी ओमप्रकाशने तिच्या खोलीत शिरून हा गुन्हा केला. त्यानंतर पहाटे पावणेपाचच्या सुमारास तो सुरक्षारक्षकाच्या केबिनमध्येच मोबाइल सोडून वसतिगृहातून बाहेर पडला. चार वाजून ५८ मिनिटांनी येथील रेल्वेरुळावर झोपून आत्महत्या करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून याआधारे पोलिस अधिक तपास करीत आहेत.
‘ताई, मी रूम रिकामी करून राहायला येते’
वसतिगृहाच्या सुरक्षारक्षकाची शिकार ठरलेल्या तरुणीची घटनेच्या आदल्या दिवशी परीक्षा संपली होती. मंगळवारी ती खोली रिकामी करून कल्याणला राहणाऱ्या आत्याकडे दोन दिवस राहायला येणार होती. तिने, चुलतबहिणीला कॉल करून, ताई मी लवकरच दोन दिवस राहायला येते, असे सांगितले होते.
मृत तरुणीच्या चुलतबहिणीने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच तिच्याशी बोलणे झाले. ८ तारखेचे गावी जाण्याचे तिकीट होते. त्यामुळे ५ तारखेला परीक्षा संपल्यानंतर ६ तारखेला रूम रिकामी करून ती दोन दिवस आमच्याकडे राहण्यास येणार होती. तसा तिने कॉल करून सांगितले होते; मात्र असाही दिवस बघावा लागेल असे वाटले नव्हते म्हणत बहिणीने हंबरडा फोडला.